Sunday, June 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडभिसेगाव गेट ते चारफाटा रस्त्याला विलंब ! 

भिसेगाव गेट ते चारफाटा रस्त्याला विलंब ! 

ग्रामस्थ व एस टी प्रवासी वर्गांचा संताप , तर कामे अर्धवटमुळे अपघाताची शक्यता..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )बहुचर्चित असलेल्या व कर्जत नगर परिषदेच्या हद्दीतील पश्चिम भागाकडील गुंडगे – भिसेगाव तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचा व एस टी प्रवाश्यांच्या दळण वळणाचा प्रमुख रस्ता असलेला भिसेगाव गेट ते चारफाटा रस्ता दोन वर्षे होण्यास आले तरी तयार झाला नसल्याने ” हत्ती गेला आणि शेपूट राहीला ” , अशी तर्हा या रस्त्याची झाली आहे . एक किलोमीटर अंतराचा हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा तयार झाला असताना इतर बरीच कामे शिल्लक असल्याने नागरिकांना याचा खूपच त्रास होत आहे.

त्यामुळे ठेकेदारांच्या मर्जीने चाललेल्या या कामावर पालिकेचे देखील दुर्लक्ष होत असल्याने पालिकेच्या ढोबळ कारभारावर नागरिकांत संताप खदखदत आहे .दोन वर्षांपूर्वी ५ जून २०२१ रोजी धुमधडाक्यात कर्जत चारफाटा ते बिकानेर ( जुने श्रद्धा हॉटेल ) या कामाचे भूमिपूजन झाले होते . एका वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे असताना अवधी होऊन दोन वर्षांचा कालावधी होण्यास आला तरी रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले नाही

. मोऱ्या , गटारे , पेव्हर ब्लॉक बसविणे , रस्त्याच्या मध्ये डिओडर , वीज कंपनीचे पोल हटविणे , लाईटची व्यवस्था करणे , तोडलेले अतिक्रमण साफ करणे , त्याचप्रमाणे इतरही कामे शिल्लक राहिल्याने ठेकेदारावर कर्जत नगर परिषदेचा अंकुश नसल्याचे दिसून येत आहे.

” मे.सिद्धीविनायक कन्स्ट्रक्शन कंपनी ” प्रो .प्रा . नरेंद्र अधसानी यांना या कामाची मंजुरी मिळालेली आहे , हा रस्ता ४९४९६५४७ /- एव्हढ्या रक्कमेचा सिमेंट काँक्रीटचा बनविण्याचा असून भिसेगाव ग्रामस्थांनी निवेदन , उपोषण , या मार्गाचा अवलंब करून हे काम सुरू झाल्याचे चित्र होते . मुख्य ठेकेदाराने स्थानिक सब ठेकेदारांना हे काम दिल्याने पालिका प्रशासन देखील ठेकेदारांची मर्जी सांभाळत वर्क ऑर्डर ची मुदत संपून देखील काम अद्यापी पूर्ण झाले नसून देखील ” ब्र ” शब्द काढताना दिसत नाही.


हा रस्ता पूर्ण झाला नसल्याने अद्यापी एस टी महामंडळाची बस सेवा , नवी मुंबईच्या गाड्या या मार्गाने जात नसल्याने नोकरदार वर्गास व प्रवासी नागरिकांना भिसेगाव येथे स्वर्गीय राजेंद्र घोलप चौक किंवा बस आगारात जाऊन बस पकडावी लागत असल्याने नाहक त्रास होत आहे . तर या मार्गावरील हालीवली , किरवली , तसेच पंचक्रोशीतील नागरिकांना कामावरून आल्यावर अंधारातून मार्ग काढावा लागतो .त्यामुळे स्थानिक नागरिकांचे या कामाकडे बारकाईने लक्ष असून कर्जत न.प. चा ढिसाळ कारभार यानिमित्ताने नेहमीच समोर येत आहे.

त्यामुळे आत्ता दुसरा पावसाळा जवळ आल्याने मे.सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रो.प्रा. नरेंद्र अधसानी यांनी उर्वरित कामे तातडीने करून भिसेगाव – गुंडगे व पंचक्रोशीतील नागरिकांना होणाऱ्या अडचणी पासून सुटका करावी , व पालिकेने ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी , अशी मागणी येथील भिसेगाव ग्रामस्थ , नागरिक , व एस टी प्रवासी वर्ग करत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page