चाकण : मद्यपी चालकाने भरधाव वेगाने टेम्पो चालवून तीन वाहतूक पोलिसांच्या अंगावर घातला . त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक , हवालदार आणि वॉर्डनर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास इंडोरन्स चौक, महाळुंगे येथे घडली. टेम्पो चालकास पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी हवालदार प्रकाश कोंढावळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार चालक किरण अर्जुन पाटील ( वय 19 , रा . रोही लगड , जालना ) याला अटक केली आहे तर , वाहन मालक नामदेव भानुदास बोडके ( वय 32 , रा . वाळुंज एमआयडीसी , ता . जि . औरंगाबाद ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शुक्रवारी दुपारी सव्वाचार वाजता इंडोरन्स चौक , महाळुंगे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र आदलिंग , पोलीस हवालदार प्रकाश कोंढावळे , वॉर्डनर दिलीप राठोड हे वाहतूक नियमन करत असताना आरोपी किरण पाटील हा छोटा हत्ती टेम्पो ( MH 20 EG 8760 ) भरधाव वेगात चालवत आला . त्याने मद्य प्राशन केलेले होते . किरण याने टेम्पो थेट पोलिसांच्या अंगावर चढवला.
यात सहाय्यक निरीक्षक आदलिंग यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आणि हवालदार कोंढावळे यांच्याही पायाला इजा झाली असून वॉर्डनर राठोड या घटनेत जखमी झाले आहेत.अपघात झाल्यानंतर किरण हा टेम्पो घेऊन पळून गेला . आरोपी टेम्पो मालक नामदेव याने किरणकडे वाहन चालवण्याचा परवाना नसताना देखील त्याला वाहन चालवायला दिले असे फिर्यादीत म्हटले आहे . पोलीस उपनिरीक्षक किरण शिंदे अधिक तपास करत आहेत.