if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) राज्यासहित रायगड जिल्ह्यात भात हा मुख्य आहार असल्याने ते खाणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे , मात्र भात खाल्याने मधुमेह ( डायबेटिस ) हा आजार होत असल्याने मधुमेह हा आजार न होणाऱ्या कमी गुण तत्वांच्या ( ग्यायसेमिक इन्डेक्स ) कमी असणाऱ्या व भरपूर पोषणमूल्य असलेल्या भात जाती विकसित करा , असा सल्ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी सहाय्यक महासंचालक डॉ. एन.डी. जांभळे यांनी प्रादेशिक कृषि संशोधन कर्जत केंद्राच्या सह्याद्री अतिथी गृहातील सभागृहात आयोजित महाराष्ट्र राज्य वार्षिक भात चर्चासत्राचे आयोजनात दिला.
यावेळी व्यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक काशीद , महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे शिक्षण व संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसाडीकर , विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे , शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके , वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रमेश कुणकेरकर , सहयोगी संशोधन संचालक डॉ. शिवराम भगत , भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. जांभळे पुढे म्हणाले की, दिवसेंदिवस भात शेतीत मजुरांची समस्या भेडसावत असल्याने यंत्राव्दारे लागवडीस सुलभ होणाऱ्या भात जाती निर्माण करणे महत्त्वाचे आहे , तसेच पेरभात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी योग्य वाण संशोधित करणेही गरजेचे आहे. गतिमान पैदास तंत्रज्ञानाचा अवलंब करून कमी कालावधीत निर्माण होणाऱ्या भात जाती संशोधित करणे व संकरित भात तंत्रज्ञान बळकट करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील सर्व भात संशोधन केंद्रात समन्वय ठेवून ते अधिक बळकट करण्याची गरज आहे. कर्जत संशोधन केंद्राचे काम योग्य दिशेने सूरू असून ते प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या कार्यक्रमात अध्यक्षीय समारोपात डॉ. शिनगारे म्हणाले की, भात हे महत्त्वाचे प्रमुख पीक असल्याने जस्त, लोह, प्रथिने यांचे प्रमाण वाढाविणाऱ्या पोषणयुक्त भात जाती विकसित करण्यावर भर दिला जात असून शेतकऱ्यांच्या गरजेनुरूप भात जाती संशोधित करणे आवश्यक आहे. कोकणातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना भेडसावणारी तीव्र मजूर टंचाई लक्षात घेता कमी श्रमात फायदेशीर शेतीसाठी नवीन यंत्रे व अवजारे निर्मितीवर लक्ष केंद्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यावरणीय बदलपूरक भात जाती पैदास विकास कार्यक्रम व गतिमान पैदास कार्यक्रम हाती घेण्यात आला असल्याने कमी कालावधीत नवीन गुणवत्तापूर्ण भात जाती संशोधित करणे शक्य होईल, असे त्यांनी नमूद केले. तर विनायक काशीद यांनी भात गट चर्चेचे महत्त्व अधोरेखित करीत यापुढे प्रगतशील शेतकरी व उद्योजक यांना सदर बैठकीत निमंत्रित करण्याची सूचना केली. यावेळी डॉ. हरिहर कौसाडीकर, डॉ. प्रशांत बोडके व डॉ. शिवराम भगत यांची समयोचित भाषणे झालीत. प्रस्ताविकात डॉ. भरत वाघमोडे यांनी सन १९६० पासून आजतागायत राज्यातील भात संशोधकांनी केलेल्या कार्याचा तुलनात्मक आराखडा मांडीत भात उत्पादकतेत तिपटीने वाढ झाल्याचे सौदाहरण स्पष्ट करीत मागील वर्षीच्या संशोधन गोषवाऱ्याचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले. आभार भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे यांनी मानले. कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेचे दिल्ली येथील माजी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एम.सी. खरकवाल, भारतीय भात संशोधन संस्था हैद्राबादचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. एस. हरीप्रसाद, इंदिरा गांधी कृषी विश्वविद्यालय, रायपूरच्या वनस्पती पैदास व अनुवंशिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दीपक शर्मा व महाराष्ट्राच्या विविध भात संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते कै. बाळासाहेब सांवत यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यानिमित्ताने उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला तसेच मान्यवरांच्या हस्ते वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.