महागाई करून विश्वासघात करणाऱ्या भाजप सरकारला निवडणुकीत धडा शिकवा – सुरेशभाऊ लाड..

0
116

महागाई विरोधात केंद्र सरकारचा राष्ट्रवादी तर्फे कर्जतमध्ये निषेध आंदोलन..

(भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे)
कोरोना संसर्ग महामारीत संकटाशी सामना करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे सोडून घरगुती गॅस , पेट्रोल, डिझेलचे भरमसाठ दर वाढवून कंबरडे मोडणाऱ्या केंद्र सरकारमध्ये बसलेल्या मोदी सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही जाहीर निषेध व्यक्त करून धिक्कार करतो असे आक्रमक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कर्जत खालापूर मतदार संघाचे माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांनी व्यक्त केले.

आज कर्जतमध्ये लोकमान्य टिळक चौक येथे ३ जुलै २०२१ रोजी केंद्रसरकारच्या महागाई व इंधन दरवाढी विरोधात प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे धिक्कार आंदोलन करण्यात आले.यावेळी माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या नेतृत्वाखाली या निषेध आंदोलनात जिल्हा संघटक तानाजी चव्हाण,राजिप चे उपाध्यक्ष तथा आरोग्य – क्रीडा -शिक्षण सभापती सुधाकरशेट घारे , कर्जत तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव ,जि. प.चे माजी सदस्य एकनाथदादा धुळे,युवा तालुका अध्यक्ष सागर शेळके,पालिकेचे विरोधीपक्ष नेते शरदभाऊ लाड,शंकर भुसारी , कर्जत तालुका महिला अध्यक्षा रंजना धुळे ,नगरसेविका पुष्पा दगडे , माजी नगराध्यक्षा रजनीताई गायकवाड ,नगरसेविका भारती पालकर ,कर्जत शहर अध्यक्ष नंदूशेट लाड ,रजपे सरपंच दिपाली प्रमोद पिंगळे ,त्याचप्रमाणे तालुक्यातील अनेक सरपंच, सदस्य,पदाधिकारी ,कार्यकर्ते व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

यावेळी सुरेशभाऊ लाड आक्रमक होत म्हणाले की केंद्र सरकारने गेली दोन वर्षांपासून कोरोना काळ असतानाही घरगुती गॅस ८०० रू. पेट्रोल १०० रू.पार करत डिझेल दरवाढ केल्याने दळणवळणात प्रचंड वाढ झाली आहे.यामुळे महागाई वाढून त्याचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. शेतकरी वर्ग हवालदिल झाले आहेत.

विजेचे दर वाढवून बिल न भरणा-यांची वीज कपात करणाऱ्या राज्य सरकारवर देखील त्यांनी ताशेरे ओढले . केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना थोडी इंधन दरवाढ झाल्यास भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करत होती,मग आत्ता का दरवाढ करून महागाई वाढवत आहे,आता कुठे गेले त्यांचे देशप्रेम,त्यांचा कळवळा , त्यांची गोरंगरिबांप्रति श्रध्दा का हरवली आहे.आता का ते मूग गिळून गप्प आहेत,असा सवाल त्यांनी भाजप प्रणित मोदी सरकारच्या केंद्र सरकारला विचारला यासाठी जनजागृती करून जनतेला नाहक त्रास देणाऱ्या व विश्वासघात करणाऱ्या भाजप सरकारला येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या , असे आवाहन देखील माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांनी केले.

यावेळी जिल्हानेते तानाजी चव्हाण यांनी कोरोना काळात रेल्वे सेवा बंद केल्याने रोजगार करून आपले कुटुंब सांभाळणाऱ्या बेरोजगार महिलांच्या व्यथा मांडल्या . सामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या केंद्र सरकारचा त्यांनी पक्षाच्या वतीने जाहीर निषेध केला .तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव यांनी इंधन , गॅस वीज दर , वाढवून सर्वसामान्य नागरिकांचे जीने हराम करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार करून राज्य सरकारने वीज दर कमी करावी अशी मागणी देखील आघाडी सरकारकडे केली . यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व धिक्कार घोषणा देण्यात आल्या . महागाई विरोधातील निवेदन त्यांनी कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांना दिले .