लोणावळा : महाशिवरात्री निमित्त नागफणी डोंगरावर स्वयंभू नागफणेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
सह्याद्रीच्या पर्वत रांगेत कुरवंडे येथे उंच सुळका असलेल्या नागफणी डोंगरावर ( ड्युक्स नोज ) वर स्वयंभू नागफणेश्वराच्या शिवलिंगावर महाशिवरात्रीच्या मध्यरात्री एक वाजता रुद्राभिषेक करण्यात आला . दुध, दही, खडीसाखर, चंदन, मध, गंगाजल, नारळ पाणी, अत्तर, रुद्राक्ष व पाणी यांच्या साहाय्याने तसेच कुरवंडे गावातील पुजारी विशाल शेळके , बाबुराव कडू व ग्रामस्त तसेच लोणावळा परिसरातील भाविक यांनी हा अभिषेक केला . या सुळक्यावर नागफणेश्वर महादेवाचे स्वयंभू लिंग आहे . तसेच शेजारी लहानशे मंदिर देखील आहे . भाविकांनी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट केली होती .त्याच बरोबर भ्रस्म लावत विधीवत पुजा अर्चा करत देवाला बेल पानं व फुले वाहत कवठे व अन्य फळांचा नैवेद्य अपर्ण करून आरती करण्यात आली . मोठ्या संख्येने भाविक हा महा अभिषेक पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी उपस्थित होते.
पुराणकाळात नागफणीच्या याच सुळक्यावर बसून इंद्रदेवांनी शंकराची बारा वर्ष तपश्चर्या केली होती . त्यावेळी शिवशंकरांनी लिंग स्वरुपात या ठिकाणी प्रकट होऊन इंद्रदेवाला शाप मुक्त केले असल्याची कथा विविध पुरानाने तसेच नाथ ग्रंथांमध्ये आहे . अशा या स्वयंभू ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून लोणावळ्यातील काही मंडळी महाशिवरात्रीच्या निमित्त मध्यरात्री रुद्राभिषेक करतात . तर पहाटेपासून दर्शनासाठी कुरवंडे गावातील ग्रामस्त , आयएनएस शिवाजी मधील नागरिक व लोणावळा शहर आणि ग्रामीण भागातील भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात.