Friday, February 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमाजी विद्यार्थी गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू करणार मोफत वाचनालय..जोमदे सरांना श्रद्धांजली.

माजी विद्यार्थी गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू करणार मोफत वाचनालय..जोमदे सरांना श्रद्धांजली.

स्व.जोमदे सरांना माजी विद्यार्थ्यांची आगळीवेगळी श्रद्धांजली…

खालापूर(दत्तात्रय शेडगे) तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी कार्यवाह व जनता विद्यालय खोपोलीचे माजी मुख्याध्यापक स्व.गणपत गहिनीनाथ जोमदे सर यांचे दिनांक 28 एप्रिल 2021 रोजी वयाच्या 63 व्या वर्षी दुःखद निधन झाले.

गणित विषयात नैपुण्य असणाऱ्या जोमदे सर यांनी अनेक नामवंत विद्यार्थी घडविले आहेत. सरांच्या अचानक जाण्याने माजी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा कमालीचे दुःखद वातावरण पसरले आहे.जनता विद्यालय, खोपोली येथील 1992 च्या वर्षी दहावी इयत्तेत टेक्निकल विभागाचे जोमदे सर हे वर्ग प्रमुख होते. सरांच्या निधनाची वार्ता कळताच देश विदेशात असणाऱ्या विद्यार्थ्यांनी दोन मिनिटं वेळ ठरवून श्रद्धांजली वाहिली.सरांची स्मृती कायम स्मरणार्थ रहावी यासाठी शालेय उपक्रम घेण्याचे ठरवून सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून खोपोली व परिसरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी निशुल्क वाचनालय बनविण्याचा संकल्प करण्यात आला.

यावेळी जनता विद्यालय येथील 10 वी च्या 1992 टेक्निकल विभागाच्या बॅच कडून पुस्तके देण्याचे ठरले आहे.चला सहज आधार होऊयात असे या उपक्रमाचे नाव ठरविण्यात आले. प्रत्येकाच्या मनात एक स्वप्न असतं अधिकारी बनण्याचं,मात्र अनेक विद्यार्थ्यांना इच्छा असूनही केवळ परिस्थितीमुळे आणि आवश्यक सोयी सुविधा, मार्गदर्शन नसल्याने अधिकारी होण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहून जाते. सामाजिक बांधिलकी मानून हे वाचनालय गरजू विद्यार्थ्यांसाठी जबाबदारी पार पाडणार आहे.

यावेळी आपल्याकडे असलेली स्पर्धा परीक्षेची पुस्तके आपण या वाचनालयासाठी दान करू शकता.या वाचनालयाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गरजु विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन आणि पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत.,तसेच कोरोना आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर तज्ञ मान्यवरांच्या मार्फत खोपोली येथे अधिकारी आपल्या भेटीला या उपक्रमाअंतर्गत मार्गदर्शन केले जाणार आहे,आपणही या उपक्रमात भाग घ्यावा असे आवाहन स्व.जोमदे सरांच्या 10 वी च्या बॅच मधील विद्यार्थी व सहजसेवा फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांनी केले आहे.


या उपक्रमासाठी संदीप पाटणकर, उमेश कुलकर्णी,राकेश खंडागळे,महेश दबके,संतोष सरदार, आकाश प्रधान,डॉ. शेखर जांभळे,आनंद तेंडुलकर, अतुल व्यास, दुर्गेश चित्ता, कैलास भोसले, किशोर पाटील,महेश जाधव,मंगेश कोठेकर,सचिन पिंगळे, प्रसाद गानू, राजेश नेरकर,सतीश देशमुख,सुशील फोंडे, विनोद दबडे,विजय पडवळ व हेमंत भावसार या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी मदतीचा निर्धार केला आहे.आपल्या आवडत्या शिक्षकप्रति असलेल्या आपुलकीच्या व स्नेहाच्या गुरुशिष्य नात्याचे महत्त्व यातून अधोरेखित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page