Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमाणकिवली ग्रामपंचायत कार्यालयाचे मोठ्या जल्लोषात उद्घाटन !

माणकिवली ग्रामपंचायत कार्यालयाचे मोठ्या जल्लोषात उद्घाटन !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) खालापूर तालुक्यातील माणकिवली ग्रामपंचायत हा पूर्वापार शिवसेनेचा बालेकिल्ला असून या परिसराच्या जोरावरच मी आमदार म्हणून निवडून आलो , या परिसराच्या असलेल्या सर्व समस्या सोडविण्यासाठी आजपर्यंत २० कोटी रुपयांचा निधी देवून पाणी , रस्ते , सभागृह , शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ग्रामपंचायत कार्यालय अशी विविध कामे करून परिसराला शोभा आणली असून भविष्यात देखील निधी देवून हा प्रभाग सुजलाम सुफलाम बनवणार असे दिलखुलास मत खालापूर तालुक्यातील माणकिवली येथे ” हिंदु-हदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे ” ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले , तेंव्हा ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार महेंद्र शेठ थोरवे , जिल्हा संपर्क प्रमुख विजय भाऊ पाटील , जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर , सरपंच बाळकृष्ण वाघमारे , उप सरपंच संजय नाना देशमुख , सर्व सदस्य ,युवा सेना तालुका अधिकारी रोहित विचारे , महिला संघटक आंग्रे , खोपोली नगरसेवक राजू गायकवाड , विजय देशमुख , सुरेश देशमुख , त्याचप्रमाणे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी ते पुढे म्हणाले की , अनेक वर्षांपासून येथील रस्त्यांची जी समस्या होती त्यास १० कोटी निधी देण्यात आला आहे .
ग्रामपंचायत कार्यालय साठी २५ लाख रु. देवून आज त्याचे लोकार्पण झाले आहे . या वास्तूतून नागरिकांच्या मुलभूत गरजा , समस्या सोडविण्याचे निराकरण करू . येथील आदिवासी भागात देखील समस्या सोडवल्या आहेत , जलजीवन मिशन अंतर्गत वॉटर स्कीमचे काम सुरू केले आहे , मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सहकार्याने आपण निधी येथवर आणत आहोत , शासनाच्या सर्व योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे , महाराष्ट्राला मुख्यमंत्री असे लाभले की ते १८ तास काम करत आहेत , शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी वर्गाने नागरिकांच्या सर्व समस्या सोडवा , महिला सक्षमीकरण करण्याच्या माध्यमातून जन जागृती होणे गरजेचे आहे , १ कोटीच्या वर बलिदान गेलेले व त्यामाध्यमातून भारतवासियांच्या अस्मितेचे असलेले ३७० कलम व श्रीराम मंदिर हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नपूर्ती होती ,यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला.
जनतेचा कौल हा शिवसेना भाजप असा असताना मात्र महाराष्ट्रात दळभद्री युती करण्यात आली मात्र रायगडात आम्हाला ती मान्य नव्हती ,असेही त्यांनी निक्षून सांगितले . विकासाला चालना द्या , शिवसैनिक म्हणुन पारदर्शकता ठेवून काम करा , असा सल्ला देखील त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना दिला.

जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर म्हणाले की , या परिसराचा विकास आमदार साहेबांनी घडविला आहे , ” घर तिथे जल ” मा .मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी येथील पाणी समस्या सोडविली आहे , रस्त्यांच्या कामासाठी कोटींचा निधी मंजूर झाला आहे , शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भव्य ग्रामपंचायत कार्यालय उभे राहिले आहे , या मतदार संघात विकासाचा झंझावात आपण पहात आहोत.
कर्जत खालापूरमध्ये ३२५ मतदार केंद्रापर्यंत आमदार साहेबांच्या संकल्पनेतून विकास निधी पोहचला आहे , या मतदार संघात परिवर्तन झाले आहे , मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचे आमदार म्हणून १००० कोटीची कामे येथे होत आहे , पुढील आमदार म्हणून कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना पुन्हा निवडून देण्यासाठी सज्ज व्हा , व यासाठी जिल्हा परिषद , पंचायत समिती , ग्राम पंचायत पुन्हा आपल्या ताब्यात घेणे गरजेचे आहे , असे मत व्यक्त केले . तर जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील म्हणाले की , ह्या ग्रामपंचायतीसाठी मोठा निधी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी दिला आहे , आंजरूण – शेनगाव – मांणकिवली – डोलवली या सर्व भागाचा विकास झाला आहे , जो प्रतिनिधी आपल्यासाठी झिजतो , त्याला पुन्हा नेतृत्व करण्याची संधी देणे गरजेचे आहे , विरोधक देखील आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या कार्याची स्तुती करत आहेत , जे बरोबर येतील त्यांना सर्वाँना या प्रवाहात सामील करून घ्या , या मतदार संघातून जास्तीत जास्त संख्येने आमदार यांना निवडून द्या , असा मोलाचा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.
- Advertisment -

You cannot copy content of this page