मावळातील कु. प्रितम दौंडकर याची कृषी अभियांत्रिकी पदवीसाठी आय.आय.टी. पश्चिम बंगाल येथे भरारी…

0
156

वडगाव दि.5 : संपूर्ण मावळ तालुक्यातील पहिलाच विद्यार्थी प्रितम गोरक्ष दौंडकर याची शेतीविषयक जमीन व जल संसाधन अभियांत्रिकी विभागात कृषी अभियांत्रिकी या विषयात उच्च शिक्षण घेण्यासाठी GATE 2021 या प्रवेश परीक्षेतून भारतातून ८५ व्या क्रमांकाने देशातील सर्वोच्च शिक्षण संस्था “आय. आय. टी. (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) खरगपूर” राज्य पश्चिम बंगाल येथे निवड झाली आहे . लाखो विद्यार्थी या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी परिक्षा देत असतात. अशा परिक्षेत प्रितमने भारतातून ८५ क्रमांकाने उत्तीर्ण होत यश संपादन केले.

प्रितम याचे कौतुक करू तेवढे कमीच. कृषी अभियांत्रिकी विषयात पदवी प्राप्त करून यशस्वी होणार ही इच्छा बाळगून त्याच्यासाठी शुभेच्छा व आर्थिक मदतीचा हात द्यावा या हेतूने वडगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्यावतीने आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या हस्ते प्रितम यास पन्नास हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.प्रितम च्या शिक्षणासाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांकडून आमदार सुनील शेळके व नगराध्यक्ष मयूर ढोरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रितम यास आर्थिक मदतीची अत्यंत गरज असून शक्य असेल त्याने प्रितम यास पुढील पदवी साठी आर्थिक मदत करावी असे आवाहन यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी केले आहे.


प्रितम चे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण वडगाव मधील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये झाले नंतरचे उच्च माध्यमिक शिक्षण तळेगाव दाभाडे येथील बालविकास महाविद्यालय तर उर्वरित पदवीचे शिक्षण पानीव, सोलापूर येथील श्रीराम कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे पूर्ण झाले.


प्रितमने पदवीचे शिक्षण कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमातून पूर्ण करताना महाविद्यालयातून पहिला व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी च्या कार्य क्षेत्रातील १० जिल्ह्यातून ५ वा क्रमांक मिळवला आहे.कृषी अभियांत्रिकी या विषयात पदवी घेताना “सिंचन व निचरा अभियांत्रिकी आणि मृदा व जलसंधारण अभियांत्रिकी” या विषयात विशेषज्ञता प्राप्त केली आहे.