
लोणावळा (प्रतिनिधी) : मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर कारने पुढे चाललेल्या एका ट्रेलरला एक कारने मागील बाजूने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लोणावळ्याजवळील कुणीनामा हद्दीत किलोमीटर क्रमांक 52/00 येथे झाला आहे.
दिपक अशोक नाटक (वय 27, रा. तळेगाव दाभाडे, मावळ) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर राहुल कैलास जाधव (वय 28, रा. तुकारामनगर, – पिंपरी), जालिंदर बापू पवार (वय 51, रा. खंडोबा माळ, आकुर्डी), रोहन भगवान वाघमारे (वय 28, रा. पिंपरी) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या ह्युंदाई अलकाझर कार क्रमांक – MH 14 JX 9385 यावरील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही कार पुढे जाणाऱ्या ट्रेलर क्रमांक RJ 06 GB 7787 ला मागून जोरात धडकली. या भीषण धडकेत कारच्या दर्शनी भागाचा चुराडा झाल्याने कारमधील दिपक नाटक याचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर व खंडाळा महामार्ग पोलिसांसह देवदूत आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करत अपघातातील जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, त्याठिकाणी जखमींवर उपचार सुरू आहेत. सदर घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत.