Saturday, July 27, 2024
Homeपुणेलोणावळामेकडोनाल्ड्स रेस्टोरंट मधून हजारो किमतीच्या तेलाचे कॅन चोरणाऱ्या चोरट्याला लोणावळा पोलिसांनी शिताफिने...

मेकडोनाल्ड्स रेस्टोरंट मधून हजारो किमतीच्या तेलाचे कॅन चोरणाऱ्या चोरट्याला लोणावळा पोलिसांनी शिताफिने केले जेरबंद…

लोणावळा (प्रतिनिधी): मॅक्डोनल्डस् रेस्टॉरंटच्या स्टोअर रूम मधून तब्बल 72 हजार रुपये किंमतीचे तेलाचे कॅन लंपास करणाऱ्या चोरट्याला लोणावळा पोलिसांच्या जलदगती कारवाईमुळे रंगेहाथ जेरबंद करण्यात यश आले आहे . सुमंत सुनिल पडवळ ( वय 24 वर्षे , रा . दत्तनगर , सरोदय स्कुलजवळ , अंबरनाथ वेस्ट , जि . ठाणे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे .
याबाबत मॅक्डोनल्डस् रेस्टॉरंटमध्ये स्टोअर मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या अक्षय अशोक चव्हाण ( वय 26 वर्षे , रा . शिलाटणे , ता . मावळ जि . पुणे ) यांनी लोणावळा पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे .
फिर्यादीनुसार रेस्टॉरंटमध्ये वापरासाठी लागणारे तेलाचे कॅन आणून ठेवले जातात . मात्र 12 ऑक्टोबर 2022 ते 13 नोव्हेंबर 2022 या दरम्यान मॅक्डोनल्डस् रेस्टॉरंटच्या स्टोअर रूम मधून तीन वेगवेगळ्या तारखेला येथे ठेवलेले तेलाचे कॅन चोरीला जात असल्याचे हॉटेल व्यवस्थापनाच्या लक्षात आले . त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तपासले असता एक व्यक्ती रेस्टॉरंटच्या खालील मजल्यावरील स्टोअर रूममध्ये असलेले तेलाचे कॅन घेवून जात असलेला दिसला . रविवारी दि . 13 नोव्हेंबर रोजी फिर्यादी अक्षय चव्हाण याला सकाळी 10.00 वा. च्या सुमारास सीसीटीव्ही मध्ये दिसलेली व्यक्ती मॅक्डोनल्डस् मध्ये दिसल्याने त्याला संशय आला आणि त्याने पोलीस कॉन्स्टेबल विकास कदम याला फोन केला.
यावर विकास कदम यांनी फिर्यादी अक्षय चव्हाण याला त्याच्या स्टाफसह सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या व ही घटना पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कदम यांनी तात्काळ रेस्टॉरंटकडे धाव घेतली . दरम्यान फिर्यादी अक्षय चव्हाण याने स्टोअर रूममध्ये जावून पाहीले असता तेथे माल कमी दिसला . त्यावर त्याने स्टोअर रूमच्या खाली असलेल्या पार्किंगमध्ये जाऊन पाहणी केली असता तेथील पायऱ्यांच्या खाली ऑईलचे दोन बॉक्स दिसले.
थोड्याच वेळात 10.15 वाजण्याच्या सुमारास संशयित सुमंत पडवळ हा पार्किंगमध्ये आला व त्याने पार्किंगच्या पायऱ्यां खाली असलेले दोन ऑईलचे बॉक्स घेतले व पांढरे रंगाच्या ज्युपिटर स्कुटरच्या फुट स्पेसजवळ ठेवले व जाण्यास निघाला . त्याचवेळी समोरून आलेले पोलीस कॉन्स्टेबल कदम यांना पाहून तो गडबडला आणि खाली पडला . त्यानंतर त्याने तेथून पळून जण्याचा प्रयत्न केला , मात्र पोलीस कॉन्स्टेबल विकास कदम यांनी प्रसंगावधान दाखवीत फिर्यादी अक्षय चव्हाण आणि मॅक्डोनल्डसचे कर्मचारी विशाल तलवार , प्रमोद पाटील , गुरुनाथ कंधारे , अमोल जाधव , कुणाल चव्हाण व संकेत कदम यांच्या मदतीने आरोपी सुमंत पडवळ याला जेरबंद केले.
याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी भादवी कलम 380 अन्वेय गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर हे करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page