Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडराज्यातील कदम मराठा बांधवानी एकत्र येऊन समाजासाठी मदत करा- अमरराजे कदम..

राज्यातील कदम मराठा बांधवानी एकत्र येऊन समाजासाठी मदत करा- अमरराजे कदम..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

राज्यातील कदम मराठा बांधवांनी एकत्र येऊन आपल्या समाजातील बांधवांना मदत करा असे आवाहन अमरराजे कदम यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्यासह गोवा,कर्नाटक, गुजरात, राजस्थानातील कदम बांधवाची व रशिया पेरू या देशातील कदम मराठा यांच्या उपस्थिती हे संमेलन पार पडले असून एकजुटीने काम करण्याचा निर्धार केला.

समस्त कदम मराठा परिवाराचे तिसरे राज्यस्तरीय कुलसंमेलन  गढीताम्हाणे, ता. देवगड जि. सिंधुदुर्ग येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनासाठी महाराष्ट्र राज्यासह गोवा, कर्नाटक, गुजरात, राजस्थान तसेच देशभरातील कदम बांधव उपस्थित होते. या कुलसंमेलनात समस्त कदम कुलाचा इतिहास उलगडण्यात आला.

देशभरातील कदम मराठा समाजाला एकजुट करावे या हेतूने या राज्यस्तरीय कुलसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी पहिले संमेलन श्री क्षेत्र तुळजापूर येथे तर दुसरे संमेलन गिरवी, ता. फलटण, जि. सातारा येथे झाले होते. तिसर्‍या संमेलनासाठी मराठा कदम परिवाराचे कोकणातील प्रमुख गाव असलेले गढीताम्हाणेची निवड करण्यात आली होती.

सकाळी कदम बंधूंचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर सर्वांनी ग्रामदैवत श्री रहाटेश्वराचे दर्शन घेतले व कार्यक्रम स्थळी मिरवणुकीने आले. संमेलनस्थळी कदम राजवंशीय ध्वजारोहण महेशभाई कदम अध्यक्ष शिवशंभो प्रतिष्ठान पुणे यांच्या हस्ते करण्यात आले.तर ९९ वर्षांचे यशवन्त कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले.


पारंपारिक गोंधळ कार्यक्रम झाला. त्यानंतर देशभरातून आलेल्या कदम बंधूंनी आपला व आपल्या गावाचा, कार्याचा स्वपरिचय करून दिला. दुपारी श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर पुजारी मंडळाचे अध्यक्ष तथा समस्त कदम मराठा परिवार संघटनेचे अध्यक्ष अमरराजे कदम व चंदगड येथील इतिहास अभ्यासक सदानंद गावडे यांनी कदम कुलाचा इतिहास सांगितला.

भारतातील कदम परिवारातील राजे व राजवटीचा इतिहास तसेच रामायण काळापासून पुढे महाभारत त्याचप्रमाणे भारतातील सातवाहन, गुप्त, मौर्य, कदंब, छत्रपती शिवाजी आदी प्रमुख राजवटींमध्ये कदम परिवारातील वीर पुरूषांनी केलेले कार्य विषद केले. कदम मराठा समाजातील कर्तृत्ववान बांधवांचा यावेळी कुलचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. 

परिवाराचे अध्यक्ष अमरराजे कदम, सचिव रामजी कदम, उपाध्यक्ष राजन कदम,दादासाहेब कदम,कोषाध्यक्ष राजेंद्र कदम,उद्योजक संतोष कदम तसेच श्रेयश कदम, संजोग कदम व गढीताम्हाणे, रहाटेश्वर गावातील समस्त कदम बांधवांनी परिश्रम घेतले.यावेळी डॉक्टर, कृषिनिष्ठ, उद्योजक, पोलीस अधिकारी,हॉटेल व्यावसायिक,शासकीय अधिकारी, धनवान यांनी आपले फोन नंबर देऊन कसल्याही मदतीसाठी फोन करण्याचे आवाहन समाज बांधवांना केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page