विक्री करणारे टपरी धारक , दुकानदार अधिका-यांच्या छत्रछायेत ?
भिसेगाव -कर्जत ( सुभाष सोनावणे )
कर्जत तालुक्यात शासनाने बंद केलेला विषारी गुटका खुलेआम बाजारपेठेत पानटपरी ,दुकानदार यांच्याकडे मिळत असल्याने कोरोना सारख्या भीषण संकटात तरुण पिढीला मरणाच्या दारात नेण्याचे काम संबंधित अधिका-यांच्या छत्रछायेत हे विक्रेते करत तर नाही ना ? असा सवाल उपस्थित झाला असून सर्वत्र निर्बंधाचे सावट असताना कडेकोट तपासणी नाके पार करत हा विषारी गुटका कर्जत तालुक्याच्या बाजारपेठेत येतोच कसा,असा प्रश्न छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेने संबंधित अधिकारी वर्गास केला आहे.
यावर कुणाचेच निर्बंध नसल्याने खुलेआम मरण वाटण्याचे काम गुटका विक्रेते करत आहेत.त्यामुळे येथे संतापाचे वातावरण आहे.शासनाने बंदी घातलेल्या गुटक्यात तंबाखू मिश्रित सुगंधी सुपारी,स्वीयिंग सेंटेंड सुपारी,बनारस सेंटेंड सुपारी तसेच ग्लिसरीन,क्विविम आणि पॅरॅफिन असे विषारी साहित्य मिक्स केले जातात.त्यामुळे हे खाणाऱ्याला कँसर, नपुंकसता, तोंडाचे , घशाचे पोटाचे भयंकर विकार, नैराश्य ,दुर्बलता,असे अनेक आजारामुळे तरुणपिढी उध्वस्त होते.याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेल्या आणि वाहतुकीस बंदी असलेली तंबाखू,सुगंधित सुपारी यांचा साठा केल्याबद्दल अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ चे कलम ५९ प्रमाणे भादवी कलम १८८ , नुसार कारवाई होते.
मात्र कर्जतमध्ये बाजारपेठेत या विषारी गुटक्याची किरकोळ विक्री करणाऱ्या टपरी धारक व दुकानदार बेधडक हा विषारी गुटका विक्री करताना दिसत असूनही अन्न व औषध प्रशासन त्याचप्रमाणे कर्जत पोलीस ठाणे यावर कारवाई करताना दिसत नाहीत.कोरोना काळ असल्याने जागोजागी तपासणी चालू असताना कर्जतमध्ये हा विषारी गुटका पानटपरी व दुकानंदारांपर्यंत पोहोचतोच कसा,असा सवाल छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेने केला.
असून कर्जत तालुक्यात विषयुक्त गुटका विकणाऱ्या टपरी व दुकान धारकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे .मात्र नागरिकांची सुरक्षा करणारे संबंधित विभागाचे अधिकारी धृतराष्ट्र सारखी डोळ्याला पट्टी बांधून बसले असल्याने त्यांच्याच छत्रछायेत हे पान टपरी व दुकानदार विषारी गुटका तर विकत नाहीत ना,असा यक्षप्रश्न उपस्थित झाला आहे.