Sunday, December 8, 2024
Homeपुणेलोणावळाराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोणावळा शहरातील 125 कार्यकर्त्यांचा राजीनामा…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोणावळा शहरातील 125 कार्यकर्त्यांचा राजीनामा…

लोणावळा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक सदस्य व पदाधिकारी यांनी आपल्या पक्षाचा व पदाचा राजीनामा दिला आहे.लोणावळा शहरातील अनेक ज्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाला साथ दिली. मागील 25 वर्ष मावळ तालुक्यात सत्ता नसताना देखील जय पराजय पचवत पक्ष नेतृत्वाच्या सोबत राहिले. त्या जुन्या जाणत्या व प्रामाणिक कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेमध्ये विश्वासात न घेता डावलले जात असल्याची नाराजी व्यक्त करत लोणावळा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा गट यामधील 125 पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांनी आज पक्षीय सदस्यत्व व पदांचे राजीनामे दिले आहेत. याबाबतचे लेखी पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित दादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे पाठवले असल्याची माहिती आज युवक अध्यक्ष विनोद होगले व जेष्ठ नेते बाळासाहेब पायगुडे यांनी दिली.
एकाच वेळी सव्वाशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने लोणावळा शहर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली असून सर्वत्र या नाराजीची व राजीनामा सत्राची चर्चा सुरु आहे.अजित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाजूला होत वेगळा गट स्थापन केल्यापासून लोणावळा शहर व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही खदखद सुरू होती. मात्र कोणीही उघडपणे पुढे येऊन याबाबत मत व्यक्त करत नव्हते.
मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके हे अजितदादा पवार यांच्यासोबत असल्याने मावळात कोणीही उघडपणे शरद पवार गटाला पाठिंबा देत नव्हते. मात्र काहीतरी नाराजी असल्याचे चित्र अनेक कार्यक्रमांमधून दिसून येत होते. आता मात्र या सर्व गोष्टींचा स्फोट झाला असून ती खदखद आज पुढे आली आहे.याला निमित्त ठरले लोणावळा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष पद. लोणावळा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विनोद होगले हे संघटनेमध्ये चांगले काम करत असताना व संघटना वाढीसाठी विविध लोकोपयोगी व सामाजिक उपक्रम राबवत असताना अचानक तडकाफडकी त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष तालुक्याच्या आढावा बैठकीमध्ये नियुक्त करण्यात आला. याबाबत होगले यांना कोणतीही कल्पना देण्यात आली नाही,किंवा लोणावळा शहरातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांशी चर्चा देखील करण्यात आली नाही.
अजित दादा पवार यांच्यापासून जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष या सर्वांना लोणावळा शहरातील व मावळ तालुक्यातील खदखद माहीत असताना व वारंवार त्यांच्या कानावर सर्व विषय घालण्यात आलेले असताना देखील पक्ष नेतृत्व दखल घेत नसल्याने अखेर नाईलाजास्तव आम्हाला हे पाऊल उचलावे लागले. व एकदा पुढे टाकलेले पाऊल आता मागे घेतले जाणार नाही अशा स्पष्ट शब्दांमध्ये या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. हे पाऊल उचलत असताना आम्ही लोणावळा शहरांमधील इतरही जुन्या जाणत्या नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. ते देखील आमच्या सोबत असून पुढील काळामध्ये अनेक गोष्टींचा उलगडा होईल, लवकरच सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घोषित करू असा इशारा या देण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य व पक्ष स्थापनेपासून पक्ष सोबत असणारे जेष्ठ नेते बाळासाहेब पायगुडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लोणावळा शहर माजी अध्यक्ष विनोद होगले, मावळ तालुका चित्रपट व सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष संतोष कचरे, अनुसूचित जाती जमाती सेलचे मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय गोसावी, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गायकवाड, रमेश दळवी, सलीम मण्यार, अजिंक्य कुटे, सुधिर कदम, कृष्णा साबळे, तुषार पाडाळे, रवी भोईने, शेखर वर्तक, शेखर खिल्लारे, युवती अध्यक्षा अॅड. गायत्री रिले, कार्याध्यक्षा नेहा पवार, रत्नप्रभा गायकवाड, गीता खिल्लारे,पुर्वा गायकवाड, निलम घाडगे, प्रतिक्षा कदम,संजय घाडगे, यशवंत दळवी यांच्या सह तुंगार्ली, वलवण, खंडाळा, गावठाण,इंदिरानगर, भांगरवाडी, नांगरगाव, ठोंबरेवाडी,हनुमान टेकडी, हुडको, जुना खंडाळा भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page