लहानग्या मुलाचा जीव वाचवून मयूर शेळके ठरला देवदूत , वांगणी रेल्वे स्थानकातील थरार.

0
94

भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे-

कर्जत या जगात अशा काही व्यक्ती आहेत की ज्या आपल्या जीवाची बाजी लावून दुसऱ्याच्या उपयोगी येतात प्रसंगी प्राण ही वाचवितात , या त्यांच्या स्वतःच्या जिवाची पर्वा न करणे ह्याला वाघाचे काळीज लागते . अशीच समयसूचकता, चित्याची चपळाई व प्रचंड आत्मविश्वास वापरून वांगणी रेल्वे स्थानकावर एका चिमुरड्याचा जीव वाचवून रेल्वेचा पॉइंट्समन देवदूत ठरला .मात्र किंचितसा जरी विलंब झाला असता तर दोघांच्याही जीवावर बेतण्याचा हा थरार दृश्य बघून अनेकांचे काळीज च…र र झाले.


कर्जत तालुक्यातील तळवडे येथील मयूर शेळके हा कर्जत रेल्वे स्थानकात पाच वर्षे झाली कामाला होता,आठ महिन्यांपूर्वी नुकतीच त्याची वांगणी रेल्वे स्थानकात पॉइंट्समन म्हणून बदली झाली आहे.शनिवार दि. १७ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजून ३ मिनिटानी वांगणी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर एक अंध महिला मुलासह चालत होती.यावेळी तो चिमुरडा प्लॅटफॉर्मच्या कडेला असताना तोल जाऊन रुळावर पडला. त्याचवेळी फास्ट पॅसेंजर गाडी अवघ्या सेकंदावर होती.

त्यामुळे अंध महिला कासावीस होऊन आरडाओरड करत होती. ही बाब पाईंटमन मयूर शेळके यांना दिसली. ते काही अंतरावर काम करत होते त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रुळावर धाव घेतली. एखाद्या चित्रपटातील दृष्य असल्यासारखी प्रत्यक्ष घटना अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवून च …र र करून गेली. पण म्हणतात ना ” देव तारी त्याला कोण मारी ” मयूर शेळके देवदूतासारख्या त्या चिमुकल्याचे प्राण वाचविण्यास आला.

मात्र एका सेकंदाचाही विलंब झाला असता तर मयूरलाही जीव गमवावा लागला असता हेही तितकंच खरं पण जीवाची बाजी लावून त्याने चिमुकल्याला जीवदान दिलं.पॉइंट्समन मयूर शेळके याच्या प्रसंगावधानाचं सर्वत्र कौतुक होत असून त्याच्या कामगिरीसाठी अनेक जण शाबासकी देत आहेत.या कौतुकास्पद कामगीरीमुळे मला खूप सुखावह वाटत असल्याचे मत मयूर शेळके यांनी सांगितले.त्याच्या कामगिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.