if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा : लोणावळा शहराच्या जवळ असलेल्या लायन्स पॉईंट या ठिकाणी बुधवारी रात्री दरीत पडलेल्या एका 21 वर्षीय मुलीचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र या रेस्क्यू पथकाला यश आले आहे. सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास सदरचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.
साक्षी रमेश होरे (वय 21, रा. म्हासाडे कान्हूरकर वस्ती, दावडी, पुणे) असे या मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. साक्षी ही अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती. काल ती एकटीच लोणावळ्यात आली होती.
लायन्स पॉईंटच्या दरीमध्ये एक मुलगी पडली असल्याचा फोन शिवदुर्ग मित्र या रेस्क्यू पथकाला गुरुवारी रात्री नऊ वाजता आला. रात्र असल्याने सकाळी लवकर शोध मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्याप्रमाणे सकाळी सहा वाजता शिवदुर्ग रेस्क्यू पथक लायन्स पॉईंट या ठिकाणी दाखल झाले. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते, विजय गाले व कर्मचारी देखील लायन्स पॉईंट या ठिकाणी पोचले होते. साहित्याची जुळवाजुळव करत रेस्क्यू पथकातील काही तरुण रोप च्या सहाय्याने दरीमध्ये उतरले. ज्या ठिकाणाहून मुलगी खाली पडली होती, त्या ठिकाणी खाली जाऊन शोध घेतला असता दगडांमध्ये तिचा मृतदेह मिळून आला. पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास सदरचा मृतदेह दरीमधून बाहेर काढण्यात आला.
शिवदुर्ग रेस्क्यू पथकातील योगेश उंबरे, ओंकार पडवळ, सचिन गायकवाड, योगेश दळवी, महेश मसने, आदित्य पिलाने, सिध्देश निसाळ, कुणाल कडु, अशोक उंबरे, यश सोनावणे, विनायक शिंदे, मयुर दळवी, रमेश कुंभार, गौरव कालेकर, कपिल दळवी, समीर देशमुख, अशोक उंबरे, राजेंद्र कडु, आयुष वर्तक, अनिल आंद्रे, सुनिल गायकवाड यांनी सदरचे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केले.
याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस अधिकचा तपास करत असून ही घटना नेमकी कशी घडली याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.