Wednesday, October 16, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडलॉक डाऊनच्या निर्बंधामुळे बंद असलेले माथेरान सुरू करा.. संतप्त ग्रामस्थांची मागणी..

लॉक डाऊनच्या निर्बंधामुळे बंद असलेले माथेरान सुरू करा.. संतप्त ग्रामस्थांची मागणी..

(माथेरान -दत्ता शिंदे )
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनच्या निर्बंधामुळे बंद असलेले माथेरान पूर्वपदावर सुरू व्हावे अशी ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे.शेती, कंपन्या तसेच कारखाने वा अन्य कोणत्याही प्रकारचे उपजीविकेचे साधन उपलब्ध नसल्याने इथल्या एकंदरीत भौगोलिक परिस्थितीचे अवलोकन करता संपूर्ण जनजीवन हे पूर्णतः पर्यटनावर अवलंबून आहे.

त्यामुळे या लॉक डाऊनच्या कठीण काळात नागरिकांसह, हॉटेल धारकांना, मोलमजुरांना, हातरीक्षा चालक, अश्वपालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच इथला व्यापारी वर्ग सुध्दा चिंतेत दिसत असून बँकांचे कर्ज, आणि मालाचे होत असलेले नुकसान यामुळे व्यापारी वर्ग पुरता हतबल झालेला आहे. लॉज धारक तसेच छोटे छोटे दुकानदार,चप्पल,पर्स वाले दुकानदार स्टॉल धारक, रेस्टॉरंट आणि ज्यांचे हातावर पोट आहे असे कष्टकरी हातरीक्षा चालक, अश्वपालक हे मोठया विवंचनेत सापडले आहेत.

पर्यटनावर इथलं सर्व अर्थकारण अवलंबून असल्याने कशाप्रकारे आपल्या संसाराचा राहाटगाडा चालवावा हा यक्षप्रश्न सर्वांसमोर उभा ठाकला आहे. मागील लॉक डाऊनच्या काळात आठ महिने निर्बंधामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली होती.तर पुन्हा १४ एप्रिल या ऐन सुट्टयांच्या हंगामात लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे अक्षरशः नागरिक आपल्या जीवनाला कंटाळून गेले आहेत.

इथे उपजीविकेचे अन्य साधन उपलब्ध नसल्याने पर्यटक आल्यास सर्वानाच रोजगाराच्या संधी प्राप्त होतात यातूनच मुलांचे शिक्षण, लग्नकार्य आणि कुटुंबाला आधार मिळत आहे. पावसाळ्यात पर्यटकांची ईथे मांदियाळी पाहवयास मिळते यातून चांगल्या प्रकारे सर्वानाच उत्पन्न मिळते. परंतु अशा परिस्थितीत आर्थिक दृष्ट्या खूपच कमकुवत झालेल्या माथेरान करांना काय करावे हेच सुचत नाही. शासनाने काही नियमांवर शिथिलता आणून हे पर्यटनस्थळ लवकरच सुरू करावे अशी मागणी सातत्याने स्थानिक नागरिक करताना दिसत आहे.


माथेरानच्या पर्यटनावर येथील जीवनमान अवलंबून असल्याने आम्ही मा जिल्हाधिकारी मॅडम यांच्याशी संपर्क करून पर्यटन सुरू होण्याबाबत चर्चा केली असून त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून लवकरच ह्यावर तोडगा काढला जाईल अशी ग्वाही दिली आहे.

( प्रशांत जाधव मुख्याधिकारी माथेरान )

या लॉक डाऊन मुळे व्यापारी वर्गाला मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.बहुतेक व्यापारी हे वयस्कर असल्याने अशा कठीण परिस्थितीत कुटुंबाच्या उदरनिर्वाह साठी मोलमजुरी करू शकत नाहीत. ईएमआई ,तसेच बँकांचे कर्ज आणि मालाची एक्सपायरी संपल्यानंतर मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.जर लवकरच माथेरानची टाळेबंदी उठवली नाही तर आत्महत्या करण्याशिवाय काहीच पर्याय नाही. त्यासाठी शासनाने हे पर्यटनस्थळ लवकरात लवकर सुरू करावे.
( भास्करराव शांताराम शिंदे –भाजीपाला व्यापारी माथेरान )

- Advertisment -

You cannot copy content of this page