लॉक डाऊन काळात सर्व उद्योग धंदे बंद झाल्याने सर्व मध्यम वर्गीयांचे वांधेच झाले आहे. परंतु काही हूड बुद्धी लोक याचा गैर फायदा घेतात अशीच एक घटना लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. दि. 19 रोजी तुंगार्ली व पांगोळी ह्या परिसरात दोन बंद बंगल्यात घरफोडया झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
लोणावळा शहर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण कडील गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक वैभव सुरवसे यांना गुप्तचरांमार्फत मिळालेल्या पक्क्या माहितीनुसार लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी या घटनेचा पूर्ण झडा लावून घटनेतील आरोपींचा शोध घेण्याकरिता लोणावळा शहर गुन्हे शोध व प्रकटीकरण पथकातील वैभव सुरवसे, अजीज मेस्त्री, मनोज मोरे, राजेंद्र मदने, आणि पवन कराड ह्यांचे विशेष पथक तयार करून मिळालेल्या माहितीच्या आधारे, सदर चोरी प्रकरणातील तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेले आरोपी हे अल्पवयीन बालक असल्याचे निष्पन्न झाले. ह्या अल्पवयीन बालकांना विश्वासात घेऊन पुढील चौकशी केली असता, लॉक डाऊन काळात तुंगार्ली व पांगोळी परिसरातील दोन बंगले फोडून 8000रु. किमतीचा एल इ डी टिव्ही, 8000 रु. किमतीच्या दोन इनव्हटर बॅटरी, 10, 000 रु. किमतीचा एक इनव्हटर, एक 5000 रु. किमतीची गॅस शिगडी आणि 1000 रु. किमतीचा एक लाईट झुंबर असा एकूण अंदाजे 32, 000/ रु. किमतीचा मुद्देमाल चोरी करण्याच्या गुन्ह्याला अंजाम दिल्याची कबुली दिली आहे. सदर तिन्ही बालकांविरोधात लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये गु. र. क्र. 306/2020, भा. द. वी. कलम 380, 454, 457, 418 प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आले असून सदर अल्पवयीन गुन्हेगारांना पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.
सदर घरफोडी करणाऱ्या अल्पवयीन बालकांसमवेत चोरी केलेला सुमारे 32, 000/ रु. कि. मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा गुन्हे शोध पथकाचे वैभव सुरवसे पो. ना.( 2098)पो. कॉ. अजीज मेस्त्री (2626) मनोज मोरे पो. कॉ. (2890) राजेंद्र मदने पो. कॉ.( 2695) व पो. कॉ. पवन कराड (2916) इत्यादींनी सदर गुन्हेगारांना शोधण्याची कामगिरी पार पाडली असून, पुढील तपास लोणावळा शहर गुन्हे शोध व प्रकटीकरण पथकाकडे सोपविण्यात आला आहे.