Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडलोकल डब्ब्यात गर्दीमुळे हात सुटल्याने गुंडगे कर्जत येथील " ऋतुजा गणेश जंगम...

लोकल डब्ब्यात गर्दीमुळे हात सुटल्याने गुंडगे कर्जत येथील ” ऋतुजा गणेश जंगम ” हिचा दुर्दैवी अंत !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) नेहमीच रेल्वे प्रशासन कर्जत प्रवाशांवर रेल्वे प्रवासा बाबतीत अन्याय करत असल्याने लोकल मधील गर्दीमुळे अनेक दुर्घटना होत आहेत . असाच गर्दीमुळे लोकल मधील लोखंडी पोलचा हात सुटल्याने रेल्वे अपघातात गंभीर जखमी होवून कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे या प्रभागातील ” ऋतुजा गणेश जंगम ” या तरुणीचा दुर्दैवी अंत झाला . त्यामुळे जंगम परिवार व गुंडगे प्रभागात हळहळ माजली.

ऋतुजा गणेश जंगम वय – २३ वर्षे सध्या राहणार म्हाडा कॉलनी, कोतवाल नगर – कर्जत हि तरुणी ठाणे येथे ट्रॅव्हल्स कंपनी कार्यालयात कामाला होती . मंगळवार दिनांक २२ ऑक्टोंबर २०२४ रोजी ती नेहमी प्रमाणे रात्री ८ – ३० वाजता ठाणे अंबरनाथ हि लोकल पकडून असा लोकल प्रवास करून येत होती . यावेळी अंबरनाथ येथे गाडी थांबल्यावर मागून येणाऱ्या कर्जत गाडीत ती चढली , मात्र या गाडीत अंबरनाथ व बदलापूर येथील अनेक प्रवासी असल्याने या गर्दीत तिला नीट जागा मिळाली नसल्याने ती दरवाज्यात लोखंडी पोलला पकडून ताटकळत उभी राहिली . यावेळी तिचे दैव खराब होत की काय वाढत्या गर्दीमुळे अंबरनाथ येथून सुटलेली ट्रेन बदलापूरच्या दिशेने निघाल्यावर काही अंतरावर ऋतुजा हिचा हात सुटला व ती रेल्वेतून खाली पडली . चालत्या लोकलमधून पडल्याने ती गंभीर जखमी झाली . तातडीने तिला रेल्वे पोलिसांनी उल्हासनगर येथे रुग्णालयात नेले असता , तिचे दुर्दैवी निधन झाले . दिवसेंदिवस कर्जत लोकलमध्ये वाढत्या प्रवाशांमुळे होणाऱ्या गर्दीतून अश्या गंभीर दुर्घटना होवून महिला वर्गाची सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकल ट्रेनला महिला वर्गाचे फक्त ३ डब्बे असल्याने गर्दीचे प्रमाण वाढले आहे . अशा भरपूर गर्दीमुळेच ऋतुजा जंगम हिला प्राण गमवावा लागला . याबाबतीत ” कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने ” अनेकांच्या तक्रारी असताना देखील कुठलीच दखल अद्यापी घेतली नसल्याचे दिसून येत असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे . कर्जत लोकलमध्ये अंबरनाथ , बदलापूर येथील प्रवासी प्रवास करतात , यामुळेच ही गर्दी होते , यावर रेल्वे प्रशासनाने योग्य आखणी करावी , अशी मागणी याप्रसंगी जोर धरू लागली आहे .ऋतुजा गणेश जंगम हिचा अंत्यविधी दुपारी गुंडगे येथे दुःखद वातावरणात झाला . जंगम परिवार व गुंडगे परिसरात या दुर्घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ पसरली आहे .
- Advertisment -

You cannot copy content of this page