लोणावळा दि.15: 75 व्या स्वातंत्र्यता दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लोणावळा आरपीएफ स्टाफ व जिआरपी स्टाफ यांच्या वतीने रेल्वे स्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारतवर्षात अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून आज साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी शासकीय निमशासकीय तसेच इतर सामाजिक संस्था व राजकीय मंडळींकडून विविध उपक्रम राबवून साजरा केला जात आहे.
याच अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून लोणावळा आरपीएफ स्टाफ व लोणावळा जिआरपी स्टाफ यांच्या वतीने रेल्वे विभागात प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नंतर आरपीएफ ठाण्याच्या परिसरात व रेल्वे दवाखाना परिसरात वेगवेगळ्या प्रकारची रोपे लावण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी आरपीएफचे पोलीस निरीक्षक सिंग सर , जिआरपी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गोसावी व स्टाफ, पीडब्ल्यूआय लोणावळा रेल्वे सिनियर सेक्शन इंजिनियर, रेल्वे वर्कशॉप सिनियर सेक्शन इंजिनियर, लोणावळा रेल्वे चीफ तिकीट इन्स्पेक्टर, लोणावळा रेल्वे स्टेशन सुप्रिडेंट, ए डिव्हिजनल इंजिनियर इत्यादी पदाधिकाऱ्यां सह रेल्वे कर्मचारी व आरपीएफ महिला कर्मचारी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.