Friday, June 14, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा कुसगाव बु.राजीनामा फसवणूक प्रकरणात सरपंचांसह पाच सदस्यांवर गुन्हा दाखल…

लोणावळा कुसगाव बु.राजीनामा फसवणूक प्रकरणात सरपंचांसह पाच सदस्यांवर गुन्हा दाखल…

लोणावळा (प्रतिनिधी) : कुसगाव बु.ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचासह पाच ग्रामपंचायत सदस्यांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी माजी सदस्य संजय तुकाराम गुंड (वय 42, रा. कुसगाव, लोणावळा) यांनी फिर्याद दिली आहे.
गुंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी ज्ञानेश्वर गुंड( रा. कुसगाव), 2) उपसरपंच सुरज दत्ता केदारी (रा. श्रमदान नगर ओळकाईवाडी), 3) राजेश बबन काटकर,( रा. ओळकाईवाडी), 4) मंदाकिनी जालिंदर झगडे, (रा. कुसगाववाडी), 5) शैला भरत मोरे, (रा. प्रेमनगर), 6) सुजाता रामचंद्र ठुले,( रा. क्रांतीनगर), 7) फरीन मज्जीद शेख, (रा. गुरववस्ती )यांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि. कलम 420, 465, 467, 468, 471, 120 (ब), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.30/06/2022 ते 27/07/2022 रोजी दरम्यान कुसगाव ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व वरील सदस्यांनी संगणमत करून दिनांक 30/06/2022 रोजी च्या सभेचे अजेंड्यामध्ये विषय क्रमांक 5 मधील अर्ज क्रमांक 28 मध्ये रिकाम्या ओळी सोडून अजेंडा पुर्ण करून त्यानंतर रिकाम्या सोडलेल्या ओळीमध्ये मी कोणत्याही प्रकारचा ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिलेला नसताना त्यांनी माझे ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा लिहून त्यावर माझी खोटी सही करून तो खरा असल्याचा भासवून, सदरचा राजीनामा अर्ज मा. जिल्हाधिकारी सो. यांच्या कार्यालयात पाठवून माझा विश्वासघात करून माझे ग्रामपंचायत सदस्य पद रिक्त करून माझी फसवणुक केली असल्याचे ग्रामपंचायत सदस्य संजय गुंड यांनी फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ हे पुढील तपास करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page