Saturday, November 2, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा कोविड केअर सेंटर मध्ये महिलांना सुरक्षा न दिल्यास आंदोलन करणार... ...

लोणावळा कोविड केअर सेंटर मध्ये महिलांना सुरक्षा न दिल्यास आंदोलन करणार… भाजपा महिला आघाडी लोणावळा शहर..

लोणावळा : सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीच्या परिस्थितीत राज्यातल्या अनेक कोविड केअर सेंटर मधील महिला रुग्णांवरील अत्याचाराच्या घटना ही सुद्धा एक चिंतेची बाब आहे. संपूर्ण राज्यात सुरु असलेल्या ह्या दुर्दैवी घटना आपल्या शहरातील कोविड केअर सेंटर मध्ये अद्याप घडल्या नाहीत आणि पुढे घडू नयेत याचे गांभीर्य लक्षात घेता भाजपा महिला आघाडी लोणावळा शहरच्या वतीने लोणावळा नगरपरिषद व लोणावळा शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे.
शहरातील कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या चिंतेची बाब आहे. शहरातील कोरोनाची साखळी तोडण्याकरिता शासकीय पातळीवर अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याच प्रमाणे लोणावळा प्रशासनाने कोविड केअर सेंटरचे केलेले नियोजन हे उत्तमच आहे. सध्यस्थितीला याठिकाणी अनेक महिला व पुरुष कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. आणि त्यामध्ये राज्यातून कोविड केअर सेंटर मधील कानावर येणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटना यामुळे येथील सुव्यवस्थेमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
त्याच संदर्भात लोणावळा परिसरातील सर्व कोविड केअर सेंटर मध्ये महिला रुग्णांच्या वार्ड मध्ये CCTV कॅमेरे बसविण्यात यावे, महिला कक्षामध्ये एमर्जन्सी बेल बसविण्यात यावी, महिला विभागात 24 तास एक महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी तसेच रात्रीच्या वेळी महिला पोलिसांमार्फत कोविड केअर सेंटर मध्ये गस्त घालण्यात यावी इ. मागण्यांचे निवेदने भाजपा महिला आघाडी लोणावळा शहरच्या वतीने लोणावळा नगरपरिषद व लोणावळा शहर पोलीस स्टेशनला दि. 23 रोजी देण्यात आली आहेत.
सदर निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने दखल घेऊन त्वरित निवेदनाप्रमाणे कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदना मार्फत देण्यात आला आहे.त्यावेळी भाजपा महिला आघाडी लोणावळा शहरच्या अध्यक्षा योगिता भरत कोकरे, सुरेखा जाधव ( नगराध्यक्षा लो.न.प. ) यांसमवेत लोणावळा भाजपा महिला आघाडीच्या सर्व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
- Advertisment -

You cannot copy content of this page