लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांची बदली,तर पोलीस निरीक्षकपदी प्रवीण मोरे यांची नियुक्ती..

0
854

लोणावळा दि.20 : पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पोलीस दलातील 29 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांची सहा महिन्यातच मुदतपूर्व बदली झाली असून त्यांच्या जागी भोर येथील अतिरिक्त कारभार असलेले नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक प्रवीण बाळासाहेब मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


अवघ्या सहा महिन्यांच्या कार्यकाळात पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी कायदा, सुव्यवस्थेबरोबर माणुसकीही जोपासली आहे. मुजावर यांनी ग्रामीण भागातील गावठी दारू भट्टयांवर व गुटखा बनवणाऱ्या कंपनीवर झापा मारत अवैध धंद्यांच्या विरोधात चांगलीच वचक निर्माण केली आहे तसेच ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था जपत आश्रयासाठी त्यांच्या हद्दीत आलेल्या अट्टल गुन्हेगारांना अटक करण्याची धडाखेबाज कामगिरी त्यांनी केली आहे.

तसेच सामाजिक भान ठेवत वाड्या पाड्यांवर जाऊन तेथील गरजू गोरगरिबांना अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. कोरोनाच्या शासकीय नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करताना कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागात होऊ नये यासाठी खूप प्रयत्न केले त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नुकतेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांना सन्मानीत केले आहे.

अशा या अनुभवी अधिकाऱ्याची अवघ्या सहा महिन्यात मुदतपूर्व बदली झाली असून त्यांच्या जागी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे हे सांभाळणार आहेत.