Saturday, September 21, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा डायग्नोसिस सेंटरने 100 रुग्णांना केले 3 लाख रुपये परत...

लोणावळा डायग्नोसिस सेंटरने 100 रुग्णांना केले 3 लाख रुपये परत…

लोणावळा दि.3: लोणावळा डायग्नोसिस सेंटर मध्ये मागील काळात कोविड संदर्भातील HRCT चाचणी करण्यासाठी रुग्णांकडून जास्तीचे पैसे आकारले जात आहेत अशा तक्रारी वारंवार येत होत्या, त्याची दखल घेत लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने व माजी उपनगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी यांच्या पुढाकाराने लोणावळा डायग्नोसिस सेंटर मध्ये HRCT स्कॅनच्या नावाखाली घेतलेले जास्तीचे पैसे आज रुग्णांना परत करण्यात आले आहेत.

शासनाच्या नियमानुसार HRCT स्कॅनचे दर आकारण्यात आले होते. त्याप्रमाणे लोणावळा डायग्नोसिस सेंटर मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून ४००० ते ४५०० रुपयांची आकारणी करण्यात आली होती.शासकीय नियमाप्रमाणे वरील चाचणी साठी २००० रुपये असताना जास्तीचे पैसे अकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी यांनी पुढाकार घेत मा.नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांच्या सहकार्याने संबंधित डायग्नोसिस सेंटरच्या मालकासोबत यशस्वी बोलणी करीत ज्या ज्या नागरिकांकडून जास्तीचे पैसे आकारले होते, त्यांना ते पैसे आज परत देण्यात आले.

सदर मदतकार्य हे नगरपरिषद कार्यालयाच्या इमारतीत करण्यात आले होते. डायग्नोसिस सेंटर मध्ये किती लोकांकडून जास्तीचे पैसे अकारले असतील याचा अंदाज आज पैसे परत घेणाऱ्यांची प्रचंड गर्दी पाहून आला आहे.लोणावळा डायग्नोसिस सेंटरमध्ये ज्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांकडून HRCT स्कॅनच्या नावाखाली जास्त पैसे घेण्यात आले होते अशा 100 रुग्णांना एकूण 3 लाख रुपये आज परत करण्यात आले.

त्यावेळी लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उप नगराध्यक्ष संजय घोणे, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी, शिक्षण समिती सभापती ब्रिन्दा गणात्रा, नगरसेवक विशाल पाडाळे, नगरसेवक निखिल कवीश्वर, पाणी पुरवठा सभापती सुधीर शिर्के, उमेश तळेगावकर, आरोग्य अधिकारी इंद्रनील पाटील, वडगाव मावळचे ट्रेजर अधिकारी राहुल कदम आदिजण उपस्थित होते.लॉक डाऊनच्या गंभीर परिस्थितीत ही मदत मिळाल्याने सर्व नागरिकांकडून नगराध्यक्षा सुरेखा जाधव व विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी यांचे आभार मानले.

- Advertisment -

You cannot copy content of this page