Friday, June 14, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा तुंगार्ली येथील अनाधिकृत बांधकामाबाबत नगरपरिषदेच्या विरोधात शंकर लंगे यांचे उपोषण...

लोणावळा तुंगार्ली येथील अनाधिकृत बांधकामाबाबत नगरपरिषदेच्या विरोधात शंकर लंगे यांचे उपोषण…

लोणावळा (प्रतिनिधी): तुंगार्ली इंदिरानगर भागातील यश गार्डन को. ऑफ हाऊसिंग सोसायटी मध्ये झालेल्या अनाधिकृत बांधकामाच्या विरोधात आज सोसायटी मधील रहिवासी शंकर लंघे यांनी लोणावळा नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण पुकारले होते.
महाराष्ट्र वाहतूक सेनेने या उपोषणाला पाठिंबा दिला होता. या आंदोलनाची दखल घेत लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी सदरचे बांधकाम येत्या 19 एप्रिल रोजी पाडण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले.
2012 साली लंघे यांनी सदर सोसायटी मध्ये प्लॅट घेतला होता. प्लॅट घेताना बिल्डरने सांगितलेला आकार व प्रत्यक्षात प्लॅटचा आकार यात तफावत असल्याचा लंघे यांचा आरोप असून त्यावरुन लोणावळा शहर पोलीस ठाण्यात बिल्डरवर फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल असल्याचे लंघे यांनी सांगितले. लंघे म्हणाले सदर सोसायटीमध्ये मंजुर आराखड्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम झाले आहे. मी 2013 सालापासून या विरोधात लढा देत आहे. या सोसायटीत पार्किंगमध्ये तसेच टेरेसवर देखील अनाधिकृत बांधकाम झाले आहे.
पार्किंगमधील बांधकामामुळे आम्हाला वाहने रस्त्यावर उभी करावी लागत असल्याने ती बांधकामे तात्काळ काढण्यात यावी अशी मागणी लंघे यांनी केली आहे. शिवसेना, मनसे व इतर राजकीय नेते मंडळींनी या आंदोलनाला पाठिंबा देत कारवाईची मागणी केल्यानंतर मुख्याधिकारी पाटील यांनी सर्व नेते मंडळींसोबत उपोषणकर्त्यांची भेट घेत कारवाईचे आश्वासन दिले. पाटील म्हणाले यापुर्वी देखील सदरची बांधकामे पाडण्यात आली होती मात्र तेथील नागरिकांनी पुन्हा बांधकामे केली. पुन्हा 16 मार्च रोजी कारवाई ठेवली होती, पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने ती कारवाई होऊ शकली नाही. येत्या 19 एप्रिल रोजी सदरची कारवाई केली जाईल. महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष महेश केदारी हे वाहन चालक मालकांसह या उपोषणात सहभागी झाले होते. नगरपरिषद गोरगरिबांवर तात्काळ कारवाई करते मात्र बिल्डरांवर कारवाई करताना बोटचेपी भूमिका घेते असा आरोप यावेळी केदारी यांनी केला.
- Advertisment -

You cannot copy content of this page