लोणावळा : स्वच्छ सर्वेक्षण 2024 व माजी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत लोणावळा नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना रोटरी क्लब ऑफ मुंबई नॉर्थ इंड व लोणावळा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता किट चे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम शनिवार दि.6 एप्रिल रोजी नगरपरिषद कार्यालयात संपन्न झाला.
स्वच्छता कर्मचाऱ्यांमुळेच साथीचे आजार टाळण्यास मदत होते. आपल्या आरोग्यासाठी ते पहाटेपासूनच शहराची स्वच्छता करतात. पहाटेपासून कार्यरत होणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो. कारण, शहराच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी टाकलेल्या उकिरड्यात ते काम करतात. संपूर्ण शहरातील कचरा संकलन करणे, रस्त्यातील उकिरडे उचलून वाहनात टाकून त्याची कचरा प्रकल्पापर्यंत विल्हेवाट लावणे, एकूणच शहर स्वच्छ करण्याची जबाबदारी ते पार पाडतात.
आपली काळजी घेणाऱ्या या स्वच्छता दूत कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी लोणावळा नगरपरिषद कायम तत्पर राहिली आहे. पलिकेमार्फत वेळोवेळी स्वच्छता कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करणे, त्यांना PPE किट देणे, हेल्थ किट देणे इत्यादी कार्यक्रम राबविले जातात असे मत लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे व आरोग्य विभाग प्रमुख विनोद बोरकर यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी रोटरी क्लब ऑफ मुंबई नॉर्थ इंड यांचे आभार मानले.