लोणावळा नगरपरिषद कोविड महासर्वेक्षण अभियानाला, लोणावळेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

0
831
लोणावळा : लोणावाळा शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने एक महत्वाची उपाययोजना म्हणून शासनाच्या ” माझे कुटुंब माझी जबाबदारी ” ह्या उपक्रमांतर्गत आज राबविलेल्या कोरोना महासर्वेक्षण अभियानाला लोणावळ्यातील व्यापारी व ईतर नागरिकांनी संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.
यावेळी आमदार सुनील शेळके, प्रांत संदेश शिर्के, मुख्याधिकारी रवी पवार, निखिल कवीश्वर, नारायण पाळेकर, सनी पाळेकर, आरोही तळेगावकर व कार्यकर्ते यांनी भांगरवाडी येथील रचना गार्डन हौसिंग सोसायटी मध्ये जाऊन ह्या महासर्वेक्षण अभियानाचा आढावा घेतला. लोणावळा नगरपरिषदेच्या कोरोना महासर्वेक्षण अभियानात नगरपरिषद शाळांचे शिक्षक, नगरपरिषद कर्मचारी, आशा सेविका, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व संघटनांचे पदाधिकारी यांना नगरपरिषदेचे स्वयंसेवक असल्याचे ओळखपत्र देऊन सहभागी करून घेण्यात आले होते. ह्या स्वयंसेवकांनी शहरातील प्रत्येक विभागातील घरोघरी जाऊन सकाळ पासून सायंकाळ पर्यंत नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून त्यांची पूर्ण माहिती एका फॉर्म मध्ये नोंद करून आरोग्य अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आली.
आजच्या दिवशी तपासणी न झालेल्या नागरिकांची दोन ते तीन दिवसात तपासणी होणार असल्याचे मुख्याधिकारी रवी पवार यांनी सांगितले. आज झालेल्या महासर्वेक्षण अभियानांतर्गत वेगवेगळ्या विभागातून एकूण 294 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील वेगवेगळ्या विभागातून 53 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे अहवालात समोर आले आहे. आजच्या प्रमाणे यापुढेही नागरिकांनी शासनाच्या ” माझे कुटुंब माझी जबाबदारी ” ह्या उपक्रमांतर्गत महासर्वेक्षण अभियानास प्रतिसाद देत शासनास सहकार्य करावे असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.