Sunday, June 23, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा व्हिपीएस हायस्कूलचे प्राचार्य विजय जोरी सर सेवानिवृत्त..

लोणावळा व्हिपीएस हायस्कूलचे प्राचार्य विजय जोरी सर सेवानिवृत्त..

लोणावळा : बुधवार दि. 31 डिसेंबर रोजी 32 वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर व्ही.पी.एस. हायस्कूल व द.पु.मेहता ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य विजयकुमार जोरी सर यांचा सेवापूर्ती समारंभ प्रशालेमध्ये संपन्न झाला. तसेच दि. ३१ रोजी मावळ तालुका व शालेय स्काऊट गाईड परिवाराने जोरी सरांना माजी विद्यार्थी व शिक्षकांच्या सहवासात छोटेखानी समारंभाद्वारे भावपूर्ण निरोप दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाला समिती अध्यक्ष बच्चुभाई पत्रावाला व शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य प्रकाश सरवदे सर यांनी भूषवले. गणित विषयाचे तज्ञ मार्गदर्शक, मराठी हिंदी व इंग्रजी भाषेवर कमांड, उत्तम स्काऊट शिक्षक, संवेदनशील साहित्यिक, सामाजिक अध्यात्मिक कार्यात आवड असणारे, उपक्रमशील विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी जोरी सरांची ओळख आहे.


हळव्या मनाच्या या सरांनी संवेदनशील भाषणाद्वारे प्रदीर्घ कार्यकालातील अनुभव कथन करीत शिक्षण संस्था, शाळा, शिक्षक सहकारी कर्मचारी आणि हितचिंतकांची कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी श्री. व सौ जोरी यांचा प्रशालेतर्फे मानपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमासाठी विद्या प्रसारिणी सभेचे कार्यवाह डॉ. सतीश गवळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सदस्य अरविंदभाई मेहता, कन्हैया भुरट, सुभाष सोनवणे, धीरुभाई टेलर, गिरीष पारख तसेच ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य आदिनाथ दहिफळे, कॉलेजचे माजी प्राचार्य संजीव रत्नपारखी व उपप्राचार्य मारुती तारु हे मान्यवरही यावेळी उपस्थित होते.


इंडियन स्काऊट गाईड फेलोशिप महाराष्ट्र राज्याचे सचिव डॉ. अमोल कालेकर व इंडियन फेलोशिप लोणावळा गिल्डचे अध्यक्ष डॉ.अशोक घाडगे हेही याप्रसंगी मंचावर उपस्थित होते. त्याचबरोबर लोणावळा शहर व मावळ तालुक्यामधून विविध शाळांचे मुख्याध्यापक, आजी-माजी विद्यार्थी, मावळ तालुक्यातील स्काऊट गाईड परिवारातील सदस्य, पत्रकार व अन्य चाहते या कार्यक्रमास उपस्थित राहून जोरी सरांना नवीन पर्व सुरु करण्याकरिता शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.


कोरोना महामारीच्या सावटामुळे कार्यक्रमाचे स्वरूप हे थोडक्यात करण्यात आले होते. सामाजिक अंतर, चेहऱ्यावर मुखपट्टी या सगळ्या गोष्टींचा योग्य वापर करुन हा कार्यक्रम पार पडला.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्षमा देशपांडे व सविता साळवेकर यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ ढुमणे व संजय पालवे तसेच प्रास्ताविक रामदास दरेकर तर आभार प्रदर्शन विजय रसाळ व संतोष तळपे यांनी केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page