लोणावळा सोशल फाउंडेशनच्या वतीने मोहम्मद पैगंबर जयंतीचे आयोजन; लहान मुलांना भेटवस्तूंचे वितरण..
लोणावळा, दि. २०: आज लोणावळा शहरात मोहम्मद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. शहरातून काढण्यात आलेली मिरवणूक बाजारपेठेच्या विविध मार्गांवरून फिरत कसमशहा वली दर्गा येथे संपन्न झाली.
मिरवणुकीदरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोणावळा सोशल फाउंडेशनतर्फे मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्यासह सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले.
यावेळी लोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी “स्वच्छ लोणावळा, सुंदर लोणावळा, हरित लोणावळा” या विषयावर जनजागृती रॅली काढली. विद्यार्थ्यांनी मिरवणुकीतून चालत असताना रस्त्यावर पडलेला कचरा गोळा करत स्वच्छतेचे धडे दिले आणि लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण केली. त्यांच्या या उपक्रमामुळे पर्यावरणविषयक संदेश देण्यात यश आले.
मिरवणुकीत सहभागी झालेल्या लहान मुलांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. आमदार सुनील शेळके आणि जिशानभाई शेख यांच्या हस्ते लहान मुलांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. भेटवस्तू मिळाल्यानंतर लहान मुलांना खाऊचे वाटपही करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यांवर आनंदाचे हसू उमटले.
कार्यक्रमाचे आयोजन जिशानभाई शेख आणि जनाब फरहानभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा सोशल फाउंडेशनचे लतीफ खान, अलीम शेख, अनीस तांबोळी, इमरान तांबोळी, पखेज शेख, जाहिद शेख, नवाज बागवान, मोहसीन अत्तार, मन्सूर मनीयार, अदनान शेख, वसीम शेख, आणि सुरज मुजावर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी मोलाचे सहकार्य केले.