Tuesday, April 16, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यातील डोंगरगाव येथे किरकोळ कारणावरून दोघांवर जीवघेणा हल्ला…

लोणावळ्यातील डोंगरगाव येथे किरकोळ कारणावरून दोघांवर जीवघेणा हल्ला…

निषेधार्थ वाल्मिकी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा..

लोणावळा (प्रतिनिधी): दहा ते बारा जणांनी एका कुटुंबातील दोघांना जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्या व कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना दि.27 मार्च रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास डोंगरगाव,केवरे रेल्वे गेट, लोणावळा,ता. मावळ, जि. पुणे येथे घडली.
याबाबत सिमा संजय टाक (वय 40, व्यवसाय नोकरी, रा. डोंगरगाव, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे ) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अमर खोले रा. डोंगरगाव व त्याचे जावई (नाव माहित नाही ) या दोघांविरोधात भादवी कलम 143,147, 148,149,323, 324,326,504,506 अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक अधिनियम )3(1) (r), 3(1) (s), 3(2) (va) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस स्टेशनमध्ये फिर्यादी सिमा संजय टाक यांनी दिलेल्या फिर्यादे नुसार फिर्यादी आणि त्यांचा मुलगा ऋषभ संजय टाक (वय 22) हे दोघे दि.27 रोजी सकाळी 10 च्या सुमारास दुचाकीवरून कामावर जात असताना यातील आरोपी अमर खोले व त्याचे जावई हे चारचाकी गाडीतून भरधाव वेगाने येवून दुचाकीस कट मारला. त्यावेळी चारचाकी चालक फोन वर बोलत असल्याने ऋषभ याने फोन खाली ठेवून गाडी चालव असे बोलल्यामुळे.अमर खोले, व त्याचे जावई हे गाडीतून खाली उतरून अमर खोले याने शिवीगाळ चालू केली.तुम्ही शिवीगाळ करू नका व्यवस्थित बोला असे ऋषभ याने बोलल्यावर अमर खोले याने तु जास्त बोलतो का? असे म्हणत त्याच्या तोंडावर बुक्का मारला.तसेच फिर्यादी ह्या भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता अमर खोले याने त्यांनाही हाताने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करून ढकलून दिले. त्यामध्ये फिर्यादी यांच्या हाताला दुखापत झाली.
त्यानंतर फिर्यादीचे दिर सागर टाक हे तेथे आले त्यांनी देखील भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना देखील अमर खोले व त्याचे जावई यांनी मारहाण केली. त्यानंतर अमर खोले याने डोंगरगावातील 10 ते 12 मुले बोलावून घेतली.त्यापैकी 2 ते 4 मुलाचे हातात कोयते होते. तेव्हा अमर खोले व इतरांनी मुलगा ऋषभ व दिर सागर याना धारधार हत्याराने मारहाण केली. त्यामध्ये ऋषभ याला डोक्याचे मागील बाजूस, हातावर तसेच दिर सागर टाक याला डावे कानावर व डोक्याला गंभीर जखमी झाले. इतरांच्या साहाय्याने उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल करून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये सदर फिर्याद दाखल करण्यात आली असून आरोपी अद्याप फरार आहेत.
टाक परिवारातील दोघांना जखमी केले असून जातीवाचक शिवीगाळ केली तसेच महिलेला देखील अश्लील शिवीगाळ करत तिच्यावर हात टाकण्यात आला . ही बाब अतिशय निंदनीय असून आरोपी अद्याप फरार आहेत. आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी आता वाल्मिकी समाज एकवटला असून उदया दि.5 रोजी पुणे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मेहतर वाल्मिकी महासंघ पुणेचे महासचिव नरेश इंद्रसेन जाधव यांनी दिली. तसेच समाजातील सर्व जेष्ठ व तरुणांनी या अन्यायाविरुद्धच्या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page