लोणावळा : भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन चे सर्वेसर्वा अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन मावळ तालुक्याच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
देशात माहिती अधिकार कायदा लोकपाल, लोक आयुक्त असे महत्वाचे कायदे आणणारे अण्णा हजारे यांचा वाढदिवस लोणावळ्यात मोठया उत्साहात पार पडला. अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन मावळ तालुक्याच्या वतीने जेष्ठ नागरिक संघ विरंगुळा केंद्र येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सीताराम डुबल, लोणावळा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भरत हारपुडे, लोणावळा शहर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, तालुका अध्यक्ष डफळ, लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोजचे अध्यक्ष सुधीर कदम, रोटरी क्लब ऑफ लोणावळा अध्यक्ष नलोडे साहेब हे उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन मावळ तालुक्याच्या वतीने प्रमुख पाहुण्यांना शाल, नारळ व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका उपाध्यक्षा कविता मोरे यांनी केले तर यावेळी अण्णा हजारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक डुबल यांनी प्रथमतः आयोजकांचे आभार मानले व अण्णा हजारे यांच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. तर भरत हारपुडे यांनी अण्णा हजारेंच्या खडतर जीवन प्रवासावर मार्गदर्शन केले तसेच लायन्स क्लबचे सुधीर कदम आणि पत्रकार बापूसाहेब पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. संजय पाटील यांनी केले तर निता गायकवाड यांनी आभार मानले.
यावेळी अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन मावळ व लोणावळा सदस्य, लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोज सदस्य व रोटरी क्लब ऑफ लोणावळाचे सदस्य तसेच जेष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य आणि इतर पाहुणे उपस्थित होते.