लोणावळा : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपा नेते किरिट सोमय्या यांनी मनी लाॅड्रिंग सह काही गंभिर आरोप केले आहेत. तर शेल कंपनीकडून मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांनी दोन कोटीचे कर्ज घेतल्याचा आरोप केला. तसेच हसन मुश्रीफ व परिवाराचा सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यात शंभर कोटीहून अधिक बेनामी व्यवहार असल्याचा आरोप करत किरिट सोमय्या यांनी कोल्हापुरात सदर कारखान्यात जाण्याचे म्हंटले होते.
यावर हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या यांनी कोल्हापुरात येऊन दाखवावे असे प्रती आवाहन दिले होते.
यानंतर कोल्हापूरकडे निघालेल्या सोमय्या यांना दिवसभर मुंबई पोलिसांनी स्थानबद्ध करून ठेवले होते. रात्री उशिरा ते महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत.
दरम्यान त्यांना समर्थन देण्यासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा नगराध्यक्षा सुरेखा जाधव, भाजपा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी रात्री पावणे अकराच्या सुमारास लोणावळा रेल्वे स्थानकावर किरिट सोमय्या यांच्या समर्थनार्थ घोषणा देत पाठिंबा दिला. तसेच रात्री अकरा वाजता रेल्वे स्थानकावर आलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये सोमय्या यांची भेट घेत समर्थन व्यक्त केले. त्याच वेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी देखील रेल्वे स्थानकावर एकत्र जमत किरिट सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी करत हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दर्शविला.