Tuesday, May 30, 2023
Homeपुणेलोणावळालोणावळा पर्यटकांवर कोयत्याने हल्ला, पर्यटक गंभीर जखमी तर चार जणांविरोधात गुन्हा दाखल…

लोणावळा पर्यटकांवर कोयत्याने हल्ला, पर्यटक गंभीर जखमी तर चार जणांविरोधात गुन्हा दाखल…

लोणावळा (प्रतिनिधी) : 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याचा प्रकार 31 डिसेंबर रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास मॅगी पॉईंट येथे घडला.
रस्त्यावर गाडी का लावली असे म्हणत पर्यटकांशी वादावादी करत त्यांच्यावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी जखमी झालेले पर्यटक निरजकुमार उमाशंकर तिवारी (वय 24, रा. खारघर, रायगड) यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीसांनी भा.द.वि. कलम 307 व अन्य कलमान्वये रोहन गायकवाड व इम्मू उर्फ इमरान शेख (दोघेही राहणार लोणावळा) व अन्य दोघेजण अशा चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
निरजकुमार तिवारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिवारी व त्याचे मित्र हर्ष विकासकुमार गुप्ता, राकेश राहुलानी व चालक करण असे चौघेजण 31 डिसेंबरच्या रात्री व्हॅगनर कार क्र. MH 46 BZ 9666 मधून लोणावळ्यात आले होते. मुंबई पुणे हायवे लगतच्या ब्लु लगून या हॉटेलमध्ये त्यांनी रूम घेतला होता.रात्री 1 वाजण्याच्या सुमारास निरजकुमार तिवारी व हर्ष हे भुक लागली म्हणून काहीतरी खायला मिळतंय का हे पाहण्यासाठी गाडी घेऊन हॉटेलमधून बाहेर पडले. समोरच मॅगी पॉईंट येथे दुकान उघडे असल्याने त्यांनी तेथे गाडी लावत जेवणासाठी पार्सल घेतले.
हर्ष हा पार्सलचे पैसे देत असताना गाडीच्या मागे उभे असलेल्या तरुणांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. हर्ष याच्या डोक्याला गंभीर मार लागून रक्तस्राव होऊ लागल्याने त्याला वाचविण्यासाठी निरज हा मधे गेला असता त्याला देखील मारहाण करून गाडीची देखील तोडफोड करण्यात आली. हर्ष ला सावरत निरज त्याला हॉटेलजवळ घेऊन गेला, तेवढ्यात तिथे आलेल्या पोलिसांनी त्यांना लोणावळ्यात खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याठिकाणी उपचार करून त्यांना नंतर पनवेल येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर पुढील तपास करत आहेत.व मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

You cannot copy content of this page