Saturday, July 27, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात मराठा बांधवांकडून गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा…

लोणावळ्यात मराठा बांधवांकडून गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा…

लोणावळा : मराठा आरक्षण लढ्याला यश मिळाल्याने लोणावळा शहरात पाचशे किलो गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला.
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या शासनाने मान्य केल्या असून तसा अध्यादेश काढण्यात आला आहे. त्यानिमित्ताने लोणावळा शहर व परिसरातील सकल मराठा समाजाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात डीजे वाजवत व गुलालाची उधळण करून नाचत जल्लोष साजरा करण्यात आला.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसह ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्या सर्वांना व त्यांचे सगे सोयरे असलेल्या सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांनी पदयात्रा सुरू केली होती. त्यांना सकल मराठा समाजाचा मोठा पाठिंबा लाभत असल्याने लाखोंचा जनसमुदाय त्यांच्या पदयात्रेमध्ये सहभागी झाला होता. 30 ते 40 किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा, नजर जाईल तिथपर्यंत फक्त भगवे वादळ असे चित्र या महाराष्ट्राने पाहिले. कित्येक लाख मराठा बांधव हे आरक्षणाच्या मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झाले होते. मराठ्यांचे हे भगवे वादळ मुंबईमध्ये पोहचले तर मुंबईचे जनजीवन विस्कळीत होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली होती. सुरुवातीला हा ना हा ना करणारे महाराष्ट्र शासन अखेर मराठ्यांच्या या भगवे वादळ मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यापुढे झुकले.
मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागण्यावर ठाम राहिल्याने अखेर शासनाला त्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्या लागल्या हा मराठ्यांच्या इतिहासामध्ये लिहिला जाणारा सुवर्णक्षण म्हणावा लागेल.पहाटे चार वाजता सदरचा अध्यादेश मान्य करण्यात आला.
यामध्ये महाराष्ट्रातील ज्या 57 लाख मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना तात्काळ प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार तसेच त्या सर्वांना व त्यांचे सगे सोयरे असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याची महत्त्वाची मागणी महाराष्ट्र शासनाने मान्य केली आहे. शपथ पत्र मोफत उपलब्ध करून देण्यात येणार. जोपर्यंत क्युरिटी पिटीशन चा निकाल लागत नाही व मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजातील मुलांना मोफत शिक्षण देणे.
अंतरवाली सराटीसह महाराष्ट्र भरामध्ये मराठा समाजावर दाखल झालेले गुन्हे मागे घेणे. यादेखील मागण्या महाराष्ट्र शासनाने मान्य केल्या असून या सर्व मागण्यांचा अध्यादेश काढण्यात आला आहे. दहा वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या हातामध्ये अध्यादेशाची प्रत देवून त्यांचे कालपासून सुरू असलेले आमरण उपोषण सोडविले आहे.अध्यादेश समाजाला दाखवून त्यांच्या संमतीनुसार अध्यादेश स्विकारण्याचा निर्णय घेतला.मराठा समाजाचा हा ऐतिहासिक विजय आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page