Saturday, July 27, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात श्री शांतीनाथ जैन संघाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त"हस्तीनापूर नगरीची" प्रतिकृती..

लोणावळ्यात श्री शांतीनाथ जैन संघाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त”हस्तीनापूर नगरीची” प्रतिकृती..

लोणावळा (प्रतिनिधी) : लोणावळ्यातील श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक देवस्थान ट्रस्ट व श्री शांतीनाथ जैन संघ यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत.
सलग नऊ दिवस चालणाऱ्या या उपक्रमांना गुरुवार दि.19 रोजी सकाळी साडेनऊ वाजता परम पूज्य आचार्य विजय अक्षय बोधिसूरीश्वरजी महाराजा यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला.श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक देवस्थान ट्रस्ट व श्री शांतीनाथ जैन श्वेतांबर संघ लोणावळा यांच्या जैन मंदिराचे हे शतकोत्तर 125 वे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षाअंतर्गत 19 ते 27 जानेवारी या कालावधीत नऊ दिवस विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह प्रवचने, महाआरती, पुजा पाठ तसेच अन्नदान,महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता लोणावळ्यातील भगवान महावीर (कुमार चौक) चौकातून आकर्षक रथात परम पूज्य आचार्य विजय अक्षय बोधिसूरीश्वरजी महाराजा यांना विराजमान करून विविध पारंपरिक वाद्यांच्या गजरात वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जैन समाजातील पुरुष, युवक, महिला,लहानांनी व युवतींनी पारंपरिक वेशभूषा धारण करत, महिलांनी डोक्यावर कलश घेऊन मोठ्या संख्येने मिरवाणुकीत सहभागी झाले होते.
तसेच या कार्यक्रमासाठी लोणावळा खोंडगेवाडी येथे भव्य दिव्य हस्तीनापूर नगरी उभारण्यात आली असून, यानगरीत भरत चक्रवर्ती भव्य भोजन कक्ष, सभामंडप, सांस्कृतिक व धार्मिक कक्षही उभारण्यात आले आहेत.परम पूज्य आचार्य विजय अक्षय बोधिसूरीश्वरजी महाराजा यांच्या आशीर्वादाने नऊ दिवस विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह प्रवचने होणार असून या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त जैन श्वेतांबर मूर्तीपूजक देवस्थान ट्रस्ट व श्री शांतीनाथ जैन श्वेतांबर संघ यांच्या वतीने सामाजिक व धार्मिक परंपरेनुसार लोणावळा गावठाणातील श्री भैरवनाथ मंदिर, श्री.हनुमान मंदिर ( खोंडगेवाडी), श्री. लक्ष्मीआई मंदिर, श्री. शितळादेवी मंदिर तसेच बुद्धविहार यांना देणगी तसेच परिसरातील नागरिक व रहिवाशांना मिठाईचे वाटप करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
या नऊ दिवस चालणाऱ्या कार्यक्रमासह 25 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रथ यात्रेत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक देवस्थान ट्रस्ट व श्री शांतीनाथ जैन श्वेतांबर संघाचे विश्वस्त प्रकाशराज चौहान, प्रकाशचंद परमार, मांगीलालजी जैन, महेंद्र ओसवाल, गिरीशभाई शहा, प्रदिपभाई पत्रावाला, नितीनभाई शहा, संदीपभाई शहा, सुरेश भंडारी, ललित ओसवाल, गिरीश मुथा यांनी केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page