
लोणावळा : शिवदुर्ग मित्र लोणावळा व आय. डी. ए. लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा व परिसरातील भटक्या कुत्र्यांची मोफत नसबंदी शस्त्रक्रिया व रेबीज लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेसाठी शिवदुर्ग मित्र लोणावळा व आय. डी. ए. यांच्यावतीने देशातील अग्रगण्य संस्था व्हर्ल्डवाईड वेटरनरी सर्व्हिस इंडिया ( मिशन रेबीज ) गोवा या संस्थेला आमत्रिंत केले असून या संस्थेमार्फत भटक्या कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया व रेबीज लसीकरण करण्यात येणार आहे. सदर मोहिमेत वर्ल्डवाईल्ड वेटरनरी सर्व्हिस या संस्थेची ऑपरेशन थिएटर प्रमाणे हॉस्पिटलच्या सर्व सुविधा असणारी अत्यअधुनिक व्हॅन लोणावळ्यात दाखल होणार आहे.
त्यासाठी लोणावळा नगरपरिषदेचे विशेष सहकार्य लाभणार असून त्या सहकार्याने लोणावळा शहर व परिसरात भटक्या कुत्र्यांची मोफत नसबंदी शस्त्रक्रिया व रेबिज लसिकरण करण्यात येणार आहे.साधारणपणे एक महिना चालणाऱ्या मोहिमेत ट्रेनिंग, जनजागृती, नसबंदी व लसिकरण असा नियोजीत कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया व रेबीज लसीकरण मोफत केले जाणार असल्यास शिवदुर्ग ऍनिमल रेस्क्यू लोणावळा कडून सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या भागातील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करायची असेल तर खालील क्रमांकावर संपर्क साधावा.