
लोणावळा( प्रतिनिधी): लोणावळ्यात फोर्ड कार पार्क करताना बापाच्या कारखाली सापडून 3 वर्षीय चिमुकल्याचा दूर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्यंत हृदय पिळवटणारी ही घटना दि.8 रोजी दुपारी 2:40 वा. च्या सुमारास लोणावळा मुंबई पुणे महामार्ग येथील ऑर्चीड हॉटेल च्या पार्किंग मध्ये घडली.
किआंश किरण माने (वय 03 वर्षे, रा चिखली, सानेचौक, ता-हवेली, जि-पुणे) असे दुर्दैवीपणे चिरडून मरण पावलेल्या चिमुरड्या बालकाचे नाव आहे. तर किरण राजकुमार माने (वय-28, रा- चिखली, सानेचौक, ता- हवेली, जि-पुणे) असे या दुर्घटनेतील बापाचे नाव आहे. याप्रकरणी दिपक शिवाजी वारंगुळे (वय 28, रा. भोसरी, आदिनाथ नगर, गव्हाणे वस्ती ) यांनी लोणावळा शहर पोलिसांत खबर दिली.
सदर फिर्यादे वरून भा.द.वी. कलम 174 नुसार आकस्मित मयत दाखल करून पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मडके पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आज दुपारी 2:40 वा.सुमारास लोणावळा येथील मुंबई पुणे महामार्गालगत असलेल्या हॉटेल ऑर्चिड च्या समोर पार्कींग मध्ये किरण माने हे त्यांच्या जवळील फोर्ड इंडियार नं. MH 14 JH 9000 गाडी पार्क करत असताना गाडीपुढे खेळणारा किआंश याच्या आंगावरून चाक गेल्याने तो मरण पावला.