वडगाव मध्ये पार पडलेल्या पर्यावरण पूरक गणेशमूर्ती तयार करण्याच्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न..

0
191

वडगाव : मोरया प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून व नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या माध्यमातून गणेशोत्सव सणानिमित्ताने..
“प्रत्येक कुटुंबासाठी, कुटूंबातील प्रत्येकासाठी” या अंतर्गत वडगाव शहरातील कुटूंबप्रमुखांकरिता राबविण्यात आलेल्या ऑनलाईन शाडूच्या मातीचे गणपती बनवणे या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.


या ऑनलाईन स्पर्धेत शहरातील तब्बल २२३ स्पर्धक कुटुंबीयांनी उत्साही सहभाग घेतला होता.खुल्या गटात झालेल्या ऑनलाईन स्पर्धेत प्रथम क्रमांक योगेंद्र चंद्रकांत ठोंबरे, द्वितीय क्रमांक अश्विनी मंगेश जाधव तर तृतीय क्रमांक संस्कार मिनीनाथ शिंदे हे स्पर्धक विजयी झाले.


या सर्व विजेत्या स्पर्धकांचे तसेच स्पर्धेत हिरीरीने सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचे, पालक वर्गाचे आणि या ऑनलाईन स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यात मुख्य भूमिका बजावणाऱ्या मोरया महिला प्रतिष्ठानच्या सर्व संचालिका यांचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी अभिनंदन केले.


विद्यार्थी व पालक वर्गाच्या कला गुणांसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले.यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा चेतना ढोरे, उपाध्यक्षा अबोली ढोरे, नगरसेविका पूनम जाधव, कविता नखाते, स्वाती चव्हाण, कुंदा ढोरे, ज्योती खिलारे, सुरेखा खांडभोर, स्नेहल पाटील, गीता वाडेकर, सारिका धुमाळ आणि विद्यार्थी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.