
वडगाव मावळ : पंजाब येथे नुकत्याच पार पडलेल्या ज्युनिअर व सिनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळविलेल्या पाचही पदक विजेत्यांना नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांनी प्रत्येकी एकवीस हजार अशी आर्थिक मदत केली.
वडगाव शहरातील युवक खेळाडू कु. चिराग वाघवले, शुभम तोडकर, रुचिका ढोरे, हर्षदा गरुड, सिद्धांत बिंदे यांनी पटीयाला (पंजाब) येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर व सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत पदक मिळवून यश संपादन केल्याबद्दल सामाजिक बांधिलकी जपत मदत नव्हे कर्तव्य या भावनेतून आज नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांच्या वतीने शहरातील पाचही खेळाडूंना प्रत्येकी एकवीस हजार रूपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला व पाचही खेळाडूंना एकूण एक लाख पाच हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
तसेच यावेळी नगराध्यक्ष मयुर ढोरे व सहकाऱ्यांच्या वतीने सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक व त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून अभिनंदन व्यक्त करण्यात आले.त्यांचे हे यश खरोखरच कौतुकास्पद असून त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. यापुढेही सातत्यपूर्ण परिश्रम व जिद्दीने यशाची अनेक शिखरे सर करावीत अशा मनःपूर्वक सदिच्छा यावेळी देण्यात आल्या आणि यापुढेही या खेळाडूंना वेळोवेळी अर्थिक मदत केली जाईल असे आश्वासन नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी दिले.