वाकसई येथील चार घरांवर दरोडा घालणाऱ्यांपैकी एकास लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केली अटक.

0
2247

लोणावळा दि.9: वरसोली टोल नाक्या जवळ वाकसई चाळ येथील वेगवेगळ्या भागात चार घरांवर एकाच रात्रीत दरोडा घालून धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरास अवघ्या काही तासातच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद. आरोपी जशीम उर्फ गावट्या सलाउद्दीन चौधरी ( वय 20, रा. वरसोली ) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

त्याचे तीन साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत आणि त्या फरार आरोपींना लवकरच ताब्यात घेऊ अशी माहिती तपास अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल शकील शेख यांनी दिली.वाकसई चाळ येथील घरांवर दरोडा घालून दागिने व रोख रकमेसह दोन दुचाकी या दरोड्यात लंपास करण्यात आल्या होत्या. आरोपी जशीम उर्फ गावट्या यास लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासातच अटक करून त्यास दोन दिवस पोलीस कस्टडीत ठेऊन त्याची कस्सून चौकशी केली असता त्याच्याकडून दरोड्यात लंपास केलेल्या मुद्देमालातील 25 हजार रोख रक्कम व दोन चांदीचे पैंजण पोलिसांनी हस्तगत केले आहे.

आरोपी जशीम उर्फ गावट्या सलाउद्दीन चौधरी यास वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, हेड कॉन्स्टेबल शकील शेख, कुतूब खान, एस. डी. शिंदे व स्वप्नील पाटील यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे.

सदर दरोड्याच्या घटनेने वाकसई परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु अवघ्या काही तासातच लोणावळा ग्रामीण पोलीसांनी गुन्ह्यातील आरोपींचा माग लावत एकास जेरबंद करून केलेल्या कामगिरीबद्दल सर्वत्र लोणावळा ग्रामीण पोलिसांचे कौतुक केले जात आहे. ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास शकील शेख करत आहेत.