
नागरिकांनो सतर्क रहा… वाकसई परिसरात दरोडेखोरांचा सुळसुळाट..
लोणावळा दि.6 : वाकसई व वाकसई चाळ येथील वेगवेगळ्या ठिकाणची तीन घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील दागिने व रोख रक्कमेसह दोन दुचाकीची नासधूस करून दोन दुचाकी लंपास केल्याची घटना काल सोमवार रोजी रात्री 12 ते पहाटे 4 च्या सुमारास घडली आहे. त्यानुसार रवींद्र गेणबा कदम ( रा. वाकसई चाळ ) यांच्या घरातील दिड तोळा सोन्याचे मंगळसूत्र व 2000 रुपये रोख रक्कम चोरट्यांनी पळविली आहे.
तसेच परमार कन्स्ट्रकशन कंपनी मध्ये काम करणाऱ्या गोविंद दत्तू देशमुख रा. वाकसई शीतल ढाब्याच्या मागे यांच्या घरातील 45000 रु. किमतीचे सोन्याचे दागिने व 2000 रोख रुपये चोरट्यांनी लंपास केले तर काही अंतरावर असणाऱ्या भंगार व्यावसायिक ईरसाद खान यांच्या घरात त्याच रात्री दरोडा घालून 90,000 रोख व 5000 रुपये किमतीचे दोन मोबाईलसह 20,000 हजार रुपये किमतीचे कानातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले त्याच बरोबर कमरुद्दीन गौसूद्दीन शेख यांच्याही घरावर त्याच रात्री दरोडा पडला असता.
त्यांच्या घरातील 30,000 रुपये किं. चे सोन्याचे मंगळसूत्र व दोन मोबाईल एक 3000 आणि एक 1000 रुपये किंमतीचा तर कृष्णा दत्तू भिल्लारे रा. वाकसई चाळ यांची दुचाकी क्र. MH 14 DL 5066 पॅशन प्रो आणि काही अंतरावर राहणारे परप्रांतीय तमानी विटकर यांची दुचाकी स्प्लेंडर प्रो क्र. KA 51 EC 8243 ह्या दोन दुचाकी राहत्या घरापासून चोरी झाल्या आहेत.
तसेच परिसरातील आणखी दोन दुचाकी पळविण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसला आहे. एका ठिकाणी एकाच रात्रीत चार घरे फोडून दरोडा घालत दोन दुचाकी लंपास केल्याच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर दरोड्या बाबत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक शकील शेख करत आहेत.