Tuesday, October 22, 2024
Homeपुणेवैशाख पौर्णिमेनिमित्त " भगवान गौतम बुद्ध " यांची जयंती महोत्सव रॉयल गार्डन...

वैशाख पौर्णिमेनिमित्त ” भगवान गौतम बुद्ध ” यांची जयंती महोत्सव रॉयल गार्डन येथे उत्साहात साजरा !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )त्रिगुण पावन पौर्णिमा म्हणजेच वैशाख बुद्ध पौर्णिमेनिमित्त शुक्रवार दि. ५ मे २०२३ रोजी कर्जत रॉयल गार्डन हॉल येथे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती महोत्सव सर्व बौद्ध बांधव एकत्र येत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचा उत्सव संपूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक विहारात साजरा व्हावा , यासाठी तालुक्यातील जवळजवळ ३० विहारांमध्ये ५० – १०० ते २०० प्रमाणे ४ हजार दिवे दान करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजल्यापासून ध्यान मंगल मैत्री आणि बुद्ध वंदनाने झाली. पूजनीय भन्ते अधिचित्तो यांनी उपस्थित सर्व उपासक उपासिकांना ” अष्टशील ” दिले. या उपोसथ व्रताचे पालन सर्वांनी संपूर्ण दिवस केले. यावेळी मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधव व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .

या महोत्सवात लहान मुलांच्या सुत्तांवर वर आधारित स्पर्धा झाल्या. या स्पर्धेचे परीक्षक उपासिका स्मिता खैरनार आणि उपासिका मेहरा गायकवाड ( पालीभाषा अभ्यासिका ) या होत्या. अनेक मुलांनी या सुत्त पठण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांनी आपले सादरीकरण केले. परीक्षकांनी या उपक्रमाबद्दल आणि मुलांच्या केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले. पूजनीय भंते अधिचित्तो यांच्या हस्ते सर्व सहभागी मुलांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले. या जयंती महोत्सवामध्ये संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन कर्जत मधील सर्व बौद्ध बांधवांनी केले होते. याप्रसंगी उपस्थितांना उपासिका अनिता वाटुंबरे आणि रोशनी शिंदे यांनी पुष्प देऊन सर्वांचे स्वागत केले.

दुपारच्या भोजन दानानंतर झालेल्या प्रबोधनाच्या सत्राचे उदघाटक म्हणून पूजनीय भन्ते अधिचित्तो यांनी आपली मौलिक देसना दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपासिका वैशाली महाजन ( BA, B.ed, MA Pali ) यांनी आपल्या सुमधुर वाणीने केले . या कार्यक्रमाची प्रस्तावना उपासक सुमित भालेराव यांनी मांडली. प्रमुख अतिथी माननीय उपासक प्रकाशजी मोरे सर ( MBA, MA Pali ) यांनी ” बाबासाहेबांची धम्मक्रांती ” या विषयावर प्रबोधन केले . मा. उपासक अनिल बागुल सर ( MSC, M.ed., MA Pali ) यांनी ” धार्मिक व्यक्तिमत्व विकास ” हा विषय मांडला. मा. उपासिका माधुरी सुमित भालेराव (बौद्धसाहित्य, पाली भाषाअभ्यासिका ) यांनी ” उपोसथ सुत्त ” हा विषय मांडला. या सत्राच्या अंती मान्यवरांच्या हस्ते काही सत्कारमूर्तींचा जाहीर सत्कार करण्यात आला. यामध्ये धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणारे द.बा. जाधव सर , एमपीएससीच्या माध्यमातून कृषी अधिकारी झालेली नेहा राजेंद्र आढाव त्याचप्रमाणे शुभम ब्राह्मणे हे सत्कारमूर्ती होते.

सायंकाळी सात वाजता सुशोभित रथामध्ये भगवान सम्यक संबुद्ध आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक रॉयल गार्डन हॉल पासून रतनसुत्त, अठ्ठावीसी परित्त , धम्मचक्रप्रवर्तन सुत्त आदी सुत्तांचे पठण करत निघाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला यावेळी P.S.I. सुरेश भालेराव , देशमुख साहेब ( गोपनीय खाते कर्जत पोलीस ठाणे ), ममदापूरचे उपसरपंच अनिकेत गायकवाड , उपासक सुरज पंडित , उपासक जगदीश गायकवाड (धम्मकाया) यांनी महाराजांना पुष्पहार अर्पण केले. ही मिरवणूक बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापर्यंत आल्यावर आयोजक महिलांनी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी ” सरणतय ” घेऊन संपूर्ण बुद्ध जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा ” बुद्ध जयंती महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कर्जत तालुक्यातील सर्व धार्मिक – राजकीय – शैक्षणिक – सामाजिक क्षेत्रातील श्रद्धावान उपासक उपासिकांनी दान पुण्य केले .
- Advertisment -

You cannot copy content of this page