बापूसाहेब भेगडे यांचे दुचाकी रॅली व पदयात्रेतून शक्ती प्रदर्शन..
तरुणाई व महिलांचा मोठ्या मताधिक्क्याने विजयाचा निर्धार..
प्रतिनिधी – श्रावणी कामत..
तळेगाव दाभाडे :व्यसनमुक्ततरुणाई, महिला सशक्तीकरण, सुसज्ज रस्ते, चांगले व्यावसायिक शिक्षण, दर्जेदार आरोग्याच्या सुविधा, शेतीसाठी पाणी, उद्योगांना अधिक पोषक वातावरण निर्माण करणे आदी संकल्प करीत, तसेच भव्य दुचाकी रॅली आणि पदयात्रेच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करीत सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचाराचा समारोप करण्यात आला.
मारुती मंदिर येथे झालेल्या समारोप सभेला माजी मंत्री मदन बाफना, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, निवडणूक प्रचारप्रमुख रवींद्र भेगडे, काँग्रेस नेते रामदास काकडे आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अपक्ष उमेदवार अण्णा उर्फ बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचारार्थ आज तळेगाव रेल्वे स्टेशन भागातील सर्व सोसायट्यांमधून दुचाकी रॅली काढण्यात आली. तसेच तळेगाव शहर गाव विभागातून बापूसाहेब भेगडे यांच्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही पदयात्रा मारुती मंदिर चौक, जिजामाता चौक, सुभाष चौक, शाळा चौक, गणपती चौक, श्री डोळसनाथ महाराज मंदिर, भेगडे आळी चौक, गणपती चौक, खडक मोहल्ला, राजेंद्र चौक, तेली अळी चौक, सुभाष चौक, माळी आळी मार्गे श्री मारुती मंदिर येथे भव्य सभेने पदयात्रेचा समारोप करण्यात आला. दरम्यान, जागोजाग महिलांनी औक्षण करीत विजय तिलक लावून बापूसाहेब भेगडे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच खंबीरपणे पाठीशी उभा राहत मताधिक्य देण्याचा निर्धार केला. त्यानंतर तळेगाव दाभाडे शहर गाव विभागामध्ये कॉलनी दुचाकी रॅली काढण्यात आली. तळेगावकरांनी या रॅलीचे जागोजागी स्वागत करीत विजयाचा विश्वास दिला.
गणेश काकडे म्हणाले, तळेगाव दाभाडेची लोकसंख्या सव्वा लाखाच्या पुढे गेली आहे. स्थानिकांसोबतच काम, नोकरी, शिक्षण, तसेच सेकंड होम म्हणून लोक तळेगावमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यामुळे तळेगावचे नियोजनबद्ध नियोजन करावे लागणार आहे. बापूसाहेब भेगडे हे नगरपरिषदेवर नगरसेवक असताना त्यांनी नियोजनबद्ध काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्यावर आजपर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, तसेच संत तुकाराम सहकारी कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेऊन शेतकरी हित पाहणारा लोकप्रतिनिधी म्हणून नावलौकिक कमावला आहे आणि मावळचा विकास हेच त्यांचे दाखवून दिले आहे. त्यामुळे बापूसाहेब भेगडे हेच विजयी गुलाल उधळणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. गेल्या काही वर्षात तालुक्याची संस्कृती लोप पावत चाललेली आहे. म्हणूनच त्या विरोधात आमचा हा मावळ पॅटर्न आहे. सोमाटणे टोल नाका बंद झाला का? देहूरोड रेड झोनचा प्रश्न सुटला का ? पवना धरणग्रस्तांचा विषय जैसे थे आहे. सोमाटणे, लिंबफाटा, वडगाव फाटा, कान्हे फाटा, कार्ला फाटा या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यासाठी काय प्रयत्न केले ? चाकण तळेगाव रस्त्यावर रोज अपघात होत आहेत या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी का प्रयत्न केले नाहीत ? असे अनेक प्रश्न गणेश भेगडे यांनी आमदार शेळकेंना विचारले. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आमदार शेळके यांच्यासाठी एकही सभा घेऊ नये, यातच सर्वकाही आले, अशी खिल्लीही उडवली. मावळात समृद्धता आणायचे असेल तर बापूसाहेब हेगडे यांना विजयी करा असे आवाहनही गणेश भेगडे यांनी केले.
बाळाभाऊ भेगडे म्हणाले, मावळच्या जनतेचे ठरले विजयाचा गुलाल तर बापूसाहेब भेगडेच उधळणार आहेत आणि महाराष्ट्रात विक्रमी मतांनी ते विजय होणार आहेत. मावळातल्या सर्व मुलींचे मामा बापूसाहेब भेगडे यांनी पालकत्व घेतले आहे. त्यामुळे बापूसाहेब भेगडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. आता ही निवडणूक मावळच्या जनतेनेच हातात घेतलेली आहे. त्यामुळे बापूसाहेब भेगडे यांचा विजय निश्चित आहे.
मदन बाफना म्हणाले, आपण सुसंस्कारीत राजकारण करणार आहात की पैशाचे ? चुकीच्या पद्धती शिकवणारा हा आमदार शेळके आहे. हा आमदार तालुक्यातील मतदारांमुळे मोठा आहे. आपल्यावर ज्यांनी उपकार केले ते विसरायचे नसतात.
प्रतिक्रिया :
बापूसाहेब भेगडे म्हणाले, महिलांचा नेहमीच आदर करीत आलो आहोत आणि यापुढेही महिलांचा आदर करीत राहणार, म्हणून तर तालुक्यांचे मुलींचे पालकत्व मी स्वीकारले आहे. त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. तालुक्यातील वातावरण गढूळ का झालं, हे वेगळं सांगायची गरज नाही. ही लढाई खरे तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. समृद्ध, शांत, सुरक्षित मावळ, वाहतूक कोंडी मुक्त मावळ, नोकरी, महिला सक्षमीकरण, मुलींसाठी माता रमाबाई आंबेडकर यांच्या नावाने मेडिकल कॉलेज काढण्याचा संकल्प आहे.
चौकट : अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी लोणावळा ते आकुर्डी आणि आकुर्डी ते तळेगाव स्टेशन असा लोकल प्रवास करीत प्रवाशांशी संवाद साधला. यावेळी प्रवाशांनी आपल्या समस्या मांडत त्या सोडविण्यासाठी तुम्ही आमदार व्हायलाच हवे. त्यासाठी आम्ही सर्व नोकरदार, व्यावसायिक, महिला, तरुण वर्ग आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असा विश्वास दिला. बापूसाहेब भेगडे यांनी सर्वांच्या मागण्या ऐकून घेत त्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचा विश्वास दिला.