Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडशिवसेना संपवण्याचा विडा उचळणा-या भाजप व बंडखोर आमदारांना येत्या निवडणुकीत नेस्तनाबूत करा-सुषमा...

शिवसेना संपवण्याचा विडा उचळणा-या भाजप व बंडखोर आमदारांना येत्या निवडणुकीत नेस्तनाबूत करा-सुषमा अंधारे..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या जोरावर भगवे वादळ उठवून ” शिवसेना ” हे लावलेले रोपटे आता वटवृक्ष झालेले असताना कुठली व्यक्ती , प्रवृत्ती व भारतीय जनता पक्ष तसेच बंडखोर आमदार यांनी शिवसेनेला संपविण्याचा विडा उचलला आहे , त्यांना येणाऱ्या निवडणुकीत नेस्तनाबूत करा , संपवून टाका , हिच खरी शिवसेनाप्रमुखांना आदरांजली ठरेल , अशी गगनभेदी आरोळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कर्जत येथे केली.
महाराष्ट्राचा आत्मसन्मान , बाळासाहेबांचे विचार…..हिंदू हृदय सम्राट शिवसेना सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृती दिनाचे औचित्य साधून कर्जत – खालापूर विधानसभा मतदारसंघात आयोजित शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने , उपजिल्हाप्रमुख तथा कर्जत न.प. चे जेष्ठ नगरसेवक – गट नेते नितीन दादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत रॉयल गार्डनच्या प्रशस्त सीबीसी लॉन्स वर शिवसैनिकांच्या अथांग गर्दीने ” शिव संवाद मेळावा ” गुरुवार दि. १७ नोव्हेंबर २०२२ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी शिवसेनेच्या रणरागिणी उपनेत्या सौ.सुषमा अंधारे , मा.शिवसेना उपनेते अल्ताफ शेख , यावेळी प्रमुख मान्यवर उपस्थित होते , तर विचारपीठावर जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील , जिल्हाप्रमुख मनोहर भोईर , सहसंपर्क प्रमुख रायगड भाई शिंदे , जिल्हा सल्लागार नवीन दादा घाटवळ , उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत , महिला जिल्हा संघटक तथा कर्जत न.प. च्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी , कर्जत ता.प्रमुख उत्तम दादा कोळंबे ,एकनाथ पिंगळे – खालापूर ता.प्रमुख ,अनिता पाटील – सहसंघटक जिल्हा महिला आघाडी , प्रथमेश मोरे – कर्जत ता.युवा अधिकारी त्याचप्रमाणे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी , महिला , व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाले की , छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मितीसाठी जेव्हा मावळे तयार करायचे होते तेव्हा मावळ्यांना भूमिका समजावून सांगण्याचा सातत्याने प्रयत्न केला , मी या शिवसंवाद मेळाव्यामध्ये , का आपल्याला शिवसेना उभी करणे गरजेचे आहे आणि का भारतीय जनता पार्टीचा पराभव करून येत्या निवडणुकीत येथील बंडखोर आमदार यांना नेस्तनाबूत करायचे आहे , हे समजून घ्या , येथील आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसेना पक्षाचा , शिवसेनाप्रमुखांचा व पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा तसेच आपल्या तमाम शिवसैनिकांचा विश्वासघात केला आहे , गद्दारी केली आहे.
म्हणूनच नुसती टिका करून उपयोगाची नसून शिवसेनेचे समन्वयक असतील , संघटक , संपर्कप्रमुख , सहसंपर्कप्रमुख , विभागप्रमुख , शाखाप्रमुख , गटप्रमुख , यांच्यापर्यंत पोहचुन शिवसेना पक्ष संपविण्याचा विडा उचलणा-या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या भाजप व येथील बंडखोर आमदार महेंद्र थोरवे यांना येणाऱ्या निवडणुकीत नेस्तनाबूत करा . शिवसेनेचे चिन्ह संपवण्याची , शिवसेना पक्ष गोठवण्याची भाषा जे कुठली व्यक्ती प्रवृत्ती करत असतील त्यांना संपवण्याचा विडा आपणच आज उचलू या , तीच खरी मानवंदना शिवसेनाप्रमुखांना देण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध असले पाहिजे , असे आवाहन उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तमाम शिवसैनिकांना केले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख तथा कर्जत न.प. चे गटनेते नितीन दादा सावंत यांच्या ” शिवालय ” या संपर्क कार्यालयाचे उदघाटन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे व उपनेते अल्ताफ शेख यांच्या शुभहस्ते करण्यात आले . यावेळी कर्जत सारख्या ठिकाणी इतकं मोठं प्रशस्त , सुंदर कार्यालय नितीन भाऊ आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून उभं केलं याबद्दल त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले . महाराष्ट्रात शिवसंवाद मेळावे सुरू आहेत आणि साधारण अजून आठ दिवसांनी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे राज्यभर दौरे २६ नोव्हेंबर २०२२ रोजी बुलढाणा येथील शेतकऱ्यांच्या भव्य मोर्चाने या दौऱ्याला सुरुवात होत आहे , तर शिवसेनेने आता कंबर कसली आहे , ज्यांनी ज्यांनी पाठीत खंजीर खुपसले आहे , त्यांना नेस्तनाबूत करणे हे शिवसेनेने पूर्णतः ठरवून ठेवले आहे ,यावर त्यांनी प्रकाश टाकला.

शिवसेनेने फक्त सत्ता स्थापनेचा कधीच विचार केला नाही , शिवसेना कायम संघर्षाच्या पावित्र्यात राहिली आहे , शिवसेनेने महाराष्ट्राची अस्मिता , मराठी माणसाचे हितसंबंध कसे जपले जातील , या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची अस्मिता कशी अबाधीत राखली जाईल याकडे जास्त लक्ष दिलं त्यामुळे ही अजून एक बाब लक्षात घ्या की जेव्हा आपण मुंबईचा विचार करतो मुंबईतल्या महापालिकेचा विचार करतो तेव्हा मुंबईची महापालिका जिंकणे ही फक्त सत्ता मिळवणे तेवढ्यासाठी नाही म्हणूनच भारतीय जनता पार्टी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून तेथील खजिना त्यांना लुटायचा आहे , असे सडेतोड बोल त्यांनी या शिवसंवाद मेळाव्यात व्यक्त केले.तर शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढण्याच्या कूटनीती आणि कपटनीतीच्या राजकारणात भाजप चे देवेंद्र फडणवीस आहेत , यावर त्यांनी प्रकाश टाकला.
भाजपच्या असूरी सत्तास्थापन करण्याला रोखण्यासाठी मी खारीचा वाटा उचलण्यासाठी शिवसेनेत पक्षप्रवेश केला असून तुम्ही ही साथ द्या , असे भावनिक आवाहन देखील त्यांनी शिवसैनिकांना केले . भाजप संविधानाची चौकट मोडीत काढत आहे , हे ही त्यांनी सविस्तर सांगितले . यासाठी त्यांनी आर्टिकल ३६८ कलम सर्वांना सांगितले . महिलांच्या हिताचा समान नागरी कायदा हि , त्यांनी सांगितला . भाजप कडे आता जे ४० कुपोषित वाघ गेले , तसेच त्यांच्याकडे इतर पक्षातील आयात केलेले नेते आहेत , त्यांच्याकडे स्वताचे असे काहीच नाही , हे ही त्यांनी सडेतोड सांगितले.
यावेळी त्यांनी अमित शहा , किरीट सोमय्या , देवेंद्र फडणवीस ,आशिष शेलार , आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर बोचरी टिका केली .देवेंद्र फडणवीस गटाने ठरवून ओबीसी आणि बहुजन नेत्यांना संपवण्याचे काम कसे केले हे देखील त्यांनी सांगितले , शिक्षणाचे बाजारीकरण , अनेक शासकीय कंपन्या बंद करून रिलायन्सचे अंबानी , अदानी यांना वाढविण्याचे काम ते कसे करत आहेत , ईडी च्या हुकूमशाहीमुळे संजय राऊत साहेबांची बेकायदेशीर अटक , नवनीत राणाचे हनुमान चाळीसा प्रकरण , यांचा पाढा ही त्यांनी वाचला.
शिवसेना जसा धर्मवीर आनंद दिघेंचा इतिहास सांगते तसा शिवभक्त साबीर भाई शेख यांचा सुद्धा इतिहास सांगते त्यामुळे शिवसेना घडवण्यासाठी शिवसेनेने कधीही जात – धर्म – पंथ बघत नसल्याचे त्यांनी सांगितले .मुदतपूर्व २०२३ ला होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व येथील बंडखोर आमदार महेंद्र थोरवे यांचा पराभव करण्यासाठी कामाला लागा , असा संदेश देखील या शिवसंवाद मेळाव्यात त्यांनी समस्त शिवसैनिकांना दिला . यावेळी ” शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो , पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे , युवा नेते आदित्य ठाकरे यांचा विजय असो , ” या गगनभेदी आरोळ्या व ” ५० खोके , बाकी सब ओके ” या बोचऱ्या आरोळ्या शिवसैनिक जोरदार देत होते.
यावेळी रॉयल गार्डन शिवसैनिक , महिला आघाडीने खचाखच भरला होता . अल्ताफ शेख – शिवसेना उपनेते , एकनाथ पिंगळे – खालापूर ता.प्रमुख , कर्जत ता संपर्क प्रमुख सुदाम दादा पवाळी , ता.संघटक बाबू घारे , निखिल पाटील , खालापूर संपर्क प्रमुख उमेश गावंड , सुनील पाटील यांनी देखील आपले विचार मांडले . यावेळी आसल अजय गायकवाड व अन्य , कशेळे येथील राजाराम शेळके व अन्य , किरवली हालीवली येथील पंढरीनाथ राऊत व अन्य , कर्जत बाजारपेठ येथील अनेक , संभाजी ब्रिगेडचे विलास सांगळे , पळसदरी , तसेच दोन्ही तालुक्यातील भाजप , शिवसेना शिंदे गट , व इतरांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.
- Advertisment -

You cannot copy content of this page