रायगड : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रायगड येथील श्रीमद्रायगिरी प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने दुर्ग “श्री सोंडाई ” वर परम पवित्र भगवा ध्वज फडकावून गडाचे संवर्धन करण्यात आले.चौक कर्जत या वाटेवर आई सोंडाई मातेच्या नावाने ओळखला जाणारा दुर्ग म्हणजे दुर्ग ” श्री सोंडाई “. बोरगाव पासून सहज नजरेत पडणारा ऐतिहासिक दुर्ग श्री सोंडाई गेली अनेक वर्ष संवर्धनाच्या प्रतीक्षेत होता. आणि श्रीमद्रायगिरी प्रतिष्ठान यांच्या हे लक्षात आल्याने या दुर्ग चे संवर्धन करण्याचा विडा उचलला आणि याअंतर्गत दुर्गावरती मातीखाली गेलेल्या सर्वच पाण्याच्या टाक्या गाळ व माती काढून मोकळ्या करत, वृक्ष लागवड, मंदिराची साफ सफाई, गंजत चाललेल्या शिड्यांना पॉलिश करून रंगावणे, दुर्गा वरती येणाऱ्या दुर्ग प्रेमींसाठी सूचना फलक लावणे तसेच दुर्गावरती कायम स्वरूपी 30 फूट उंच भक्कम असा भगवा ध्वज फडकावत तब्बल बारा मोहिमा यशस्वी राबविण्यात आल्या. मोहिमा यशस्वी पार पडल्यानंतर या परिवाराकडून भंडारा उधळून आनंद व्यक्त करण्यात आला.त्यांच्या या कार्याचे स्थानिकांकडून तसेच रायगड जिल्ह्यात भरभरून कौतुक करण्यात येत आहे.
श्रीमद्रायगिरी प्रतिष्ठान या संस्थे मार्फत अनेक दुर्ग वरती संवर्धन व स्वच्छता मोहिमा राबविल्या जात असतात. तसेच ऐतिहासिक मंदिरे, ऐतिहासिक बारव, ऐतिहासिक समाधी – विरगळी – सातीशीळा यांचे संवर्धन व माहिती वाचन करून ते सर्वांना समजावणे अशा अनेक मोहिमा या परिवारा मार्फत राबविल्या जातात. तसेच यापुढेही श्रीमद्रायगिरी परिवार आपला ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी अशाच अनेक मोहिमा राबवत राहणार असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.