भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे-
कर्जत-ई चावडी व ई फेरफार या योजने अंतर्गत संगणकावरून देण्यात येणाऱ्या सात बारा , आठ अ , उताऱ्याच्या प्रती वितरित करताना संबंधितांकडून रुपये – १५/- इतकी रक्कम शुल्क आकारावी , व सदर रक्कमेतील रू.५/- याप्रमाणे जमा होणारी रक्कम शासन हिस्सा म्हणून जिल्हाधिकारी यांचे नांवे असलेल्या लेखाशीर्षाखाली दरमहा जमा करावी व उर्वरित रक्कम रू.१०/- संबंधित तलाठयांनी स्वतःकडे ठेवावे व या रक्कमेतून संगणक , प्रिंटर देखभाल/ दुरुस्ती , विजेचा खर्च करावा व त्याचा स्वतंत्र हिशोब ठेवावा.
तसेच ज्या तलाठयांनी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण योजनेतून संगणक व प्रिंटर खरेदी करून उपलब्ध केले आहेत. त्यांनी सर्व रक्कम रू.१५/- नुसार एकूण जमा होणारी रक्कम आयुक्त निहाय शासन हिस्सा म्हणून लेखाशीर्षाखाली दरमहा जमा करायची आहे.
मात्र असे शासन आदेश असतानाही कर्जत तालुक्यातील तलाठयांनी सन २०१४ ते २०१८ शासन दरबारी एक पैसा ही जमा केला नसल्याचे माहिती अधिकारात पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कोकण विभाग अध्यक्ष रमेश कदम व उपाध्यक्ष दशरथ मुने यांना स्पष्ट झाल्याने संबंधित तलाठी व महसुल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हावी याकरिता लोकमान्य टिळक चौक – कर्जत येथे आमरण उपोषणास बसले होते.ते उपोषण चौथ्या दिवशी एक महिन्यात संबंधित माहिती देण्यात येईल , या तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या लेखी आश्वासनानंतर तूर्त स्थगित करण्यात आले.
सदर शासन आदेशाचे पालन तलाठी योग्य रितीने करतात की नाही , याबाबतीत लेखा – जोखा जिल्हाधिकारी पासून प्रांत अधिकारी , तहसीलदार , मंडळ अधिकारी यांनी घेणे गरजेचे असताना या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष झाल्याने कर्जत तालुक्यात सन २०१४ ते २०१८ पर्यंत झालेल्या जमीन खरेदी – विक्री वरून पाहता संगणकावरून अनेक सातबारा व फेरफार दिल्याचे उपोषणकर्ते रमेश कदम यांचे म्हणणे असून त्यामुळेच हा झालेला भ्रष्टाचार करोडो रुपयांचा असू शकतो,त्यामुळेच आम्ही याबाबतची माहिती मागितली होती,मात्र संबंधित अधिकारी वर्ग अर्धवट माहिती देऊन हा गौप्यस्फोट झाकण्याचा प्रयत्न करत असल्यानेच आम्ही उपोषणाचा मार्ग पत्करला होता असे उपोषणकर्ते यांनी सांगितले.
यापूर्वी देखील आम्हाला आश्वासन देऊन उपोषण सोडविण्यात आले होते,तर आत्ताही एक महिन्यात संपूर्ण माहिती देण्याचे आश्वासन देऊन आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन तूर्त उपोषण स्थगित केले आहे.असे पोलीस मित्र संघटना , नवी दिल्ली – भारत या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कोकण विभाग अध्यक्ष रमेश कदम व उपाध्यक्ष दशरथ मुने यांनी सांगून उपोषणाची चौथ्या दिवशी तूर्त सांगता झाली आहे.
यावेळी उपोषण सोडते प्रसंगी कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख निवासी तहसीलदार सुधाकर राठोड , कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर , पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संतोषदादा चौधरी.राष्ट्रीय निरिक्षक श्री हनुमंत ओव्हाळ , महाराष्ट्र प्रदेश प्रभारी श्री हरिष काळे , पोलीस मित्र संघटनेचे साईनाथ मुने , व इतर पदाधिकारी , शेतकरी बंधू , व्यापारी वर्ग , अनेक कर्जतकर उपस्थित होते.