सोमाटणे टोल नाका कायमस्वरूपी बंद करण्यासाठी येत्या 16 तारखेला सर्वपक्षीय आंदोलन…

0
120

तळेगाव : जुन्या पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सोमाटणे जवळ असलेला टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्यासाठी 16 तारखेला सर्वपक्षीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लिंब फाटा ते टोल नाका पायी रॅली काढुन शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सर्व पक्षीय टोल हटाव कृती समितीच्यावतीने तळेगाव येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.

मागील काही दिवसांपासून बेकायदेशीर टोलनाका कायमस्वरूपी बंद करावा यासाठी सर्वपक्षीय समिती कायदेशीर मार्गाने लढा देत असुन , तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत टोलनाका बेकायदेशीर असल्याचे सर्व पुरावे देऊन टोलनाका त्वरित हटवा अशी मागणी केली . एमएसआरडीसीने 8 एप्रिलपर्यंत टोलनाका कायदेशीर असल्याचा पुरावा देण्यासाठी मुदत मागितली होती परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे पुरावे सादर न केल्याने आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचे यावेळी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी सांगितले.

यावेळी रवींद्र भेगडे म्हणाले सामान्य नागरिकांची पिळवणूक होऊ नये म्हणुन सोमाटणे व वरसोली टोलनाका कायमस्वरूपी बंद व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष आग्रही आहे . भारत राजपत्रानुसार सोमाटणे टोलनाका अनधिकृत आहे . पोलीस आणि आयआरबीने दिलेली आश्वासने फोल ठरल्याने येत्या 16 एप्रिलला सर्वपक्षीय महामोर्चा काढणार असल्याचे यावेळी शिवसेना शहरप्रमुख दत्तात्रय भेगडे यांनी सांगितले.

यावेळी जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे , भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे , रवींद्र माने , काँगेस शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे , माजी तालुकाध्यक्ष ऍड . दिलीप ढमाले , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गणेश काकडे , युवक अध्यक्ष आशिष खांडगे , शिवसेना शहरप्रमुख दत्तात्रय भेगडे , सुनील मोरे , देवा खरटमल , मनसे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर , सचिन भांडवलकर , प्रवक्ते मिलिंद अच्युत , कल्पेश भगत , राहुल खळदे , अमोल शेटे , आरपीआयचे सुनील पवार उपस्तीत होते.