सोमाटणे येथील अनधिकृत टोल नाका हटविण्याबाबत वडगाव न्यायालयात याचिका…

0
204

वडगाव मावळ : सोमाटणे टोलनाक्या विरुद्ध न्यायालयीन लढाई सुरू करण्यात आली असल्याचे वृत्त आहे . मागील अनेक दिवसांपासून जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर अनाधिकृतपणे असलेला सोमाटणे टोलनाका हटवण्यासाठी मावळ परिसरातील नागरिक आणि सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी आंदोलने केली, टोलनाका हटविण्याची मागणी केली . मात्र हा टोलनाका हटविण्यात येत नसल्याने हा वाद न्यायालयात गेला आहे.

सामाजिक कार्यकर्ते अनिल भांगरे , सुनील पवार , डॉ . अभिषेक हरिदास यांनी आयआरबी , एमआरडीसी आणि इतर यांच्या विरोधात वडगाव मावळ न्यायालयात याचिका दाखल केल आहे . यावर 2 मे रोजी
याचिकाकर्त्यांच्या बाजूने याप्रकरणी युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला आहे.

आयआरबीकडून टोलनाक्यामार्फत लोकांची वर्षानुवर्षे लूट सुरू आहे . मात्र यात मोठमोठ्या नेत्यांचे व अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याने या विरोधात अद्याप कोणतीही कारवाई झालेली दिसून आली नाही . अनेक वेळा संघटना व राजकीय पक्षांनी आंदोलने केली मात्र उपयोग काहीच नाही . पुणे ते मुंबई टोल नाक्यावर नागरिकांची वर्षानुवर्षे फक्त लूट सुरू असून एम . एस . आर.डी. सी अधिकारी तक्रारीवर कोणतीही कारवाई करत नाही अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली . केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या यादीत पुणे मुंबई महामार्गावरील टोल नाका देहूरोडला दाखवण्यात आला असून तो वास्तविक सोमाटणे म्हणजेच तळेगाव दाभाडे हद्दीत आहे . तसेच दोन टोल नाक्यातील अंतर हे 60 किलोमीटर असावे असा नियम असतानाही या नियमाकडे रीतसर दुर्लक्ष करून नाहक टोल घेतला जात आहे.

तळेगाव दाभाडे , वडगाव , लोणावळा येथील रहिवासी , व्यापारी यांनी असे स्पष्ट केले की नियमित वाहतुकीसाठी आम्हाला दुसरा मार्ग नसून फक्त सोमाटणे फाट्यावरील टोल भरूनच आम्हाला पुण्याला जावे लागते . मात्र नियमानुसार स्थानिक वाहतुकीस 25 टक्के टोल घ्यावा व लोकल कमर्शियल वाहतुकीस 50 टक्के टोल घ्यावा हे स्पष्ट असतानाही सोमाटणे फाट्या वरती 100 टक्के टोल वसूल केला जात आहे . त्यामुळे स्थानिक लोकांना नाहक भुर्दंड व टोल कॉन्ट्रॅक्टर यांना गैरकानुनी लाभ होत आहे . याबाबत वस्तुस्थिती तपासून तळेगाव दाभाडे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता अनिल भांगरे , सुनील पवार , डॉ . अभिषेक हरिदास यांनी आय . आर . बी , एम . आर . डी . सी व इतर विरोधात वडगाव मावळ न्यायालयात सी . आर.पी.सी 39 अंतर्गत भा.द.वी कलम 409 खाली याचिका दाखल केली आहे . सदर याचिकेत न्यायालयाने सूनवाईचे आदेश दिल्याने डॉ . अभिषेक हरिदास व अनिल भांगरे यांनी दि.2 मे रोजी युक्तिवाद केला आहे.