भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
स्वातंत्र्य मिळवून आज ७५ वर्षे पूर्ण झाली असली तरी नागरिकांना आजही मूलभूत गरजांसाठी झुंज द्यावी लागते . रस्ते – वीज – पाणी – शिक्षण – रोजगार या सुविधा आजही ग्रामीण भागाच्या टोकापर्यंत पोहचल्या नसल्याचे दिसून येत असल्याने अद्यापपर्यंत नागरिक स्वातंत्र्य झाले आहेत की नाहीत ,असे खेदजनक चित्र आजही पहाण्यास मिळत आहे.शासन – प्रशासन कागदोपत्री नवनवीन योजना जरी आखत असले तरी त्याची कार्यतत्परता कुठेच दिसून येत नाही . कुठे – कुठे लालफितीत या योजना अडकून पडत आहेत ,तर कुठे – कुठे या योजना प्रत्यक्षात उतरल्या तरी भ्रष्टाचाराने बरबटलेल्या असल्याने अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने टक्केवारीच्या साखळीमुळे निकृष्ठ दर्जाची कामे सर्वत्र दिसून येत आहेत.
आजही नागरिकांना आपल्या मूलभूत गरजांसाठी निवेदने – अर्ज – विनंत्या , तर कामांत झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी निकृष्ठ दर्जाची केलेल्या कामांना तोंड फोडण्यासाठी मोर्चे – आंदोलने – आमरण उपोषण – करावी लागत आहेत.तर अनेक अधिकारी लाच मागत असल्याने त्यांना लाचलुचपत खाते पकडून जेरबंद करतानाचे चित्र सर्वत्र दिसत आहेत . शेतकऱ्यांच्या – कामगारांच्या – नागरिकांच्या करातून पाच आकडी पगार घेणारे लोकसेवक अधिकारी फक्त खुर्ची उबवण्याचे काम करताना दिसत असून कुणाचे कुणावर अंकुशहीन परिस्थिती या ७५ वर्षात दिसून येत आहे.
यामुळे नागरिकांच्या समस्यांचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.सर्वत्र विजेची चोरी , पाण्याची चोरी , रस्त्यांची देखील चोरी होताना दिसत आहे. धनदांडगे बिल्डर अधिका-यांना हाताशी धरून बिनबोभाट बेकायदेशीर कामे करताना सर्वत्र दिसत आहेत.यासाठी देखील नागरिकांनाच झुंज द्यावी लागत आहे.ज्या परिसरात अशी बेकायदेशीर कामे होतात , त्या परिसरातील लोकप्रतिनिधी यांना जबाबदार ठरवून त्यांनीच पाठपुरावा करून ते बेकायदेशीर काम तोडण्यासाठी काम करणे , असा कायदा होणे गरजेचे वाटते.निव्वळ प्रशासनाच्या जीवावर राहिल्यास अधिकारी वर्ग सामान्य नागरिकांना भीक देखील घालत नसल्याचे दिसून येत आहे . त्यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या अश्या अधिका-यांवर कारवाई होणे गरजेचे वाटते.
म्हणूनच स्वातंत्र्याची ७५ वर्षे एकमेकांवर पांघरून घालण्यावर , भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या अध्यापनाचा ” एन्ड ” कधी होणार ? याचीच प्रतीक्षा सर्वसामान्य नागरिक करताना दिसत आहेत. आपल्याला स्वातंत्र्य किती झुंज देऊन , हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळाले आहे , हे सर्वांनी लक्षात ठेवून आपले कर्तव्य बजावणी करण्यासाठी डोळ्यावरची पट्टी काढल्यास सर्वत्र सुजलाम – सुफलाम चित्र दिसेल , यांत शंकाच नसेल !