Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडहालीवली गावात वीज कंपनीचा सावळा गोंधळ ,विजेच्या उच्च व कमी दाबामुळे नागरिकांच्या...

हालीवली गावात वीज कंपनीचा सावळा गोंधळ ,विजेच्या उच्च व कमी दाबामुळे नागरिकांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान..

सरपंच प्रमिला बोराडे यांची ट्रान्सफॉर्मर व पोल बदली करण्याची मागणी.

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत तालुक्यातील हालीवली ग्रामपंचायत हद्दीत विज कंपनीचा सावळागोंधळ चालू असून लावलेल्या ट्रान्सफॉर्मरची शक्ती कमी असल्याने विजेचा दाब कमी – जास्त होत असून त्याचा परिणाम घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर होत आहे,पर्यायाने नागरिकांचे यामुळे नुकसान होत आहे.

याला जबाबदार असणाऱ्या कर्जत वीज कंपनी कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता देवके व कनिष्ठ अभियंता डफळ यांना वारंवार तक्रारी करूनही ट्रान्सफॉर्मर व जुने झालेले विजेचे खांब बदली करत नसल्याने नागरिकांत प्रचंड संताप पसरला आहे,या रोषाला ग्रामपंचायतीकडे तक्रारी येत असल्याने सरपंच म्हणून मला ही सामोरे जावे लागत असल्याने येत्या १५ दिवसांत गांभीर्याने न घेतल्यास आम्ही देखील विजेची बिले भरणार नाहीत , असा आक्रमक पावित्रा हालीवली ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच सौ.प्रमिला सुरेश बोराडे यांनी हालीवली ग्रामस्थांच्या वतीने वीज अधिका-यांना ईशारा दिला आहे.


हालीवली ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांची वस्ती झपाट्याने वाढत आहे.त्यातच हालीवली गावात देखील नवनवीन घरे , इमारती होत असताना पूर्वीचा वीज कंपनीने लावलेला ट्रान्सफॉर्मर फक्त २०० के.व्ही.असल्याने त्यावर जादा भार पडून वीज समतोल रहात नसून दाब कमी – जास्त प्रमाणात होत आहे.तर अनेकवेळा परिसरात एक फेज जाणे ,वीज जाणे,असे प्रकार सतत होत असतात.याबाबतीत अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रारी करूनही वीज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता देवके व कनिष्ठ अभियंता डफळ हे लक्ष देत नसून त्यांना याबाबत काहीच गांभीर्य नाही.

अनेक वर्षांचे विजेचे खांब गंजलेले असून कधीही पडण्याच्या स्थितीत आहेत.त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही , हे विजेचे खांब बदली करा ,असे वारंवार सांगूनही अभियंते काहीच काम करत नाहीत , तर वीज वारंवार गेल्यास वीज कंपनीचे वायरमन थातुरमातुर काम करून देतात मात्र विजेचा कमी जास्त लोड झाल्याने हा २०० के.व्ही. ट्रान्सफॉर्मर त्याची तेव्हढी क्षमता नसल्याने याचा परिणाम इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब तर टिव्ही , वोशिंग मशीन , फ्रीज , एसी , फॅन , नादुरुस्त होऊन नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे.

यामुळे नागरिक सातत्याने सरपंच म्हणून ग्रामपंचायती कडे ट्रान्सफॉर्मर व विजेचे पोल बदली करण्याच्या मागणी करत असल्याचे सांगून या रोषाला सरपंच म्हणून आम्हालाही सामोरे जावे लागते , असे हालीवली सरपंच सौ.प्रमिला बोराडे यांनी स्पष्ट केले.आमच्या समस्येकडे दुर्लक्ष करून हे अभियंते बिलांची वसुली करताना नागरिकांची पिळवणूक करतात , मात्र नागरिकांच्या समस्या सोडविताना अनेक कारणे सांगतात.

वाढीव रक्कमेची अवाजवी बिले , मीटर बदली , संगणकाद्वारे वीज बिलात एन्ट्री न होणे , रिडिंगचे प्रॉब्लेम , विजेचे पोल जुने बदली करणे , जुन्या झालेल्या वायर चेंज करणे ,२०० केव्ही चा ट्रान्सफॉर्मर बदली करणे त्याचप्रमाणे इतर अनेक तक्रारी सोडविण्यास असमर्थ ठरणाऱ्या वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे आता नागरिकांचे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे.

ही भरपाई कोण देणार , असा सवाल सरपंच सौ.प्रमिला बोराडे यांनी उपस्थित केला आहे , त्यामुळे त्वरित २०० के.व्ही. ट्रान्सफॉर्मरच्या जागी जादा कपॅसिटी चा ट्रान्सफॉर्मर लावावा , जेणेकरून विजेचा दाब कमी – जास्त होऊन इलेक्ट्रॉनिक वस्तू निकामी – खराब होणार नाहीत , व जुने विजेचे खांब त्वरित बदली करून द्यावेत , अन्यथा आम्ही देखील विजेची बिले भरणार नाहीत असा सज्जड ईशारा हालीवली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.प्रमिला सुरेश बोराडे , यांनी ग्रामस्थांच्या वतीने कर्जत वीज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता देवके यांना दिला आहे.


यावेळी कर्जत वीज कंपनी कार्यालयात हालीवली सरपंच सौ.प्रमिला बोराडे , शिवसेनेचे मा.विभाग प्रमुख सुरेश बोराडे , उपसरपंच केतन बोराडे व ग्रा.कर्मचारी सोपान बोराडे आदी निवेदन देताना उपस्थित होते .

- Advertisment -

You cannot copy content of this page