Saturday, December 7, 2024
Homeपुणेमावळ७० वर्षानंतर पहिल्यादा पठारावरील महिला सरपंच, आणि पाउलवाटेने चाललेला विकास,……

७० वर्षानंतर पहिल्यादा पठारावरील महिला सरपंच, आणि पाउलवाटेने चाललेला विकास,……

लेख- दत्तात्रय शेडगे – गारमाळ खोपोली…..

मावळ तालुक्यातील पहिल्यादा उकसान पठारावरील उकसान ग्रामपंचायतच्या सरपंच पदी ताईबाई दत्तू आखाडे यांच्या रूपाने धनगर समाजाला संधी मिळाली, त्यांचा कार्यकाळ 18 आक्टोबर 2018 ते 22 आगस्ट 2020 पर्यंत आहे.गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वाखाली धनगर वाड्यावर विकास हळूहळू चालू होता.

मात्र गेल्या सहा महिन्यापासून कोरोना आल्यामुळे विकासकामे ठप्प झाली, आणि त्यातच सुरू लवकर सुरू झालेला पाऊस, यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली, उकसान पठार वस्ती क्रमांक 1 मध्ये धनगर समाजाची ८ कुटुंब राहतात, या ठिकाणी अद्याप कोणत्याच मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या, केवळ याच वस्तीवर नव्हे तर संपूर्ण पठारावरच नाहीत, मात्र सरपंच बाई यांनी स्वतः ग्रामपंचायत मधून आपल्या वाडीसाठी अनेक विकासकामांसाठी निधी मंजूर करून घेतला.

यात स्मशानभूमी, चावडी कट्टा, आणि हायमास्क दिवे, ही कामे अंतिम टप्प्यात आहेत, मात्र या पठारावर जाण्यासाठी नीट रस्ताही नसल्याने या हायमास्क दिव्यांचे सामान न्यायचे कसे? असा प्रश्न सरपंच बाई यांच्यासमोर उभा राहील आहे, त्यातच त्यांनी वस्तीवरील महिलांना तरुणांना जेष्ठांना बरोबर घेऊन तब्बल ४ किमी ची डोंगर कड्यातून पायपीट करून जीव धोक्यात घालून हायमास्क चे सामान डोक्यावर वस्तीवर नेले,एकीकडे देशाचा विकास बुलेट ट्रेनच्या दिशेने वेगाने धावत असताना मात्र येथील विकास हा पाऊलवाटेंनेच चालला आहे.


उकसान पठारावर अश्या अनेक ठिकठिकाणी वस्त्या असून सुमारे १०० कुटूंब राहत आहेत मात्र त्यांच्यापर्यंत अजूनही विकास तर सोडाच मूलभूत सुविधाही अजून पर्यंत पोहचल्या नाहीत.


७० वर्षानंतर पहिल्यादा धनगर समाजाला या ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाची संधी मिळाली असून त्या संधी चे सरपंच ताईबाई दत्तू आखाडे यांनी पुरेपूर फायदा उचलला असून आपल्या वाडीवर पिढ्यान्पिढ्या असलेल्या समस्या सोडवण्यासाठी सरपंच बाई आजही मोठ्या शिताफीने काम करत असून मावळ तालुक्यात एक धनगर समाजाची महिला सरपंच असुनही उकसान पठारावरील होत असलेला विकास करून गेल्या ७० वर्षांपासून रखडलेला कामे त्या आजही मार्गी लावण्यात त्यांच्या प्रयत्न आहेत,त्यांना वाडी वस्तीवरील ग्रामस्थांनी मोलाची साथ दिली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page